मागील भांडणाच्या कारणावरुन टोळक्याची तरुणाला मारहाण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील भांडणाच्या कारणातून एका तरुणास आठ-दहा जणांच्या टोळक्याने तलवार व लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता.22) रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरातील मालपाणी लॉन्स येथे घडली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार, योगेश सोमनाथ पोगुल (वय 30, रा.जय जवान चौक, इंदिरानगर) याचे शुभम शिंदे, अमित रहातेकर, धीरज रहातेकर, पंकज दुधे, रवी म्हस्के, अनिल गायकवाड, पप्पू गायकवाड आणि इतर दोघा-तिघांशी पाच-सहा महिन्यापूर्वी भांडण झाले होते. याबाबत परस्परविरोधी फिर्यादींवरुन गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री योगेश हा मित्र आकाश गायकवाड याच्यासोबत अक्षय शिंदे याच्या टॅटूच्या दुकानासमोर गेले होते. तेथे शुभम शिंदे हा आला आणि योगेश पोगुलला म्हणाला, तु इथे काय करतोस? तेव्हा योगेश म्हणाला की, काही नाही घरी चाललो आहे. त्यानंतर अचानकपणे शुभम शिंदे याने योगेशला जमिनीवर पाडून म्हणाला की, तु अमितच्या नादी लागतो काय? आज तुला दाखवतोस. त्याचवेळी अमित रहातेकर हा हातात तलवार घेऊन व धीरज रहातेकर, पंकज दुधे, रवी म्हस्के, अनिल गायकवाड, पप्पू गायकवाड हे हातात लोखंड रॉड घेऊन आले. आणि म्हणाले की, मागच्यावेळी वाचला तु चुकीच्या माणसाच्या नादी लागला आहे. तुला आज जिवंत सोडणार नाही, असे म्हणून शुभम शिंदे याने हातातील तलवारीने योगेशच्या डोक्यावर वार करुन त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना योगेशने उजवा हात आडवा घातल्याने तलवारीचा मूठ लागून हाताला दुखापत झाली. त्याचवेळी शुभम शिंदे व रवी म्हस्के यांनी योगेशला खाली पाडून धीरज रहातेकर, अनिल गायकवाड व पप्पू गायकवाड यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने योगेशच्या दोन्ही पायांवर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, योगेशच्या मित्रांनाही तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखविल्याने ते पळून गेले. एवढ्यावरच न थांबत टोळक्याने जखमी योगेशला जीवे ठार मारण्यासह घरच्यांसह जाळून टाकण्याची धमकी दिली.

या प्रकरणी खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या योगेश पोगुल याने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरोधात गुरनं.162/2021 भादंवि कलम 307, 326, 143, 147, 148, 149, 504, 506 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहे.

Visits: 122 Today: 1 Total: 1113704

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *