गुटखा तस्करांविरोधात शहर पोलिसांनी पुकारला ‘एल्गार’ दोन दिवसांत चार कारवाया करीत दीड लाखांचा गुटखा केला जप्त

नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रीरामपूरातील कारवाईने चव्हाट्यावर आलेल्या जिल्ह्यातील गुटख्याच्या गोरखधंद्यावर संगमनेर शहर पोलिसांनी वक्रदृष्टी टाकली आहे. गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चार कारवायांमधून पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून दीड लाखांचा गुटखाही हस्तगत केला आहे. याप्रकरणी पकडण्यात आलेल्या तस्करांवर भारतीय दंड संहितेसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून या चौघांनाही गजाआड करण्यात आले आहे. या कारवाईने बासनात गेलेली जिल्ह्यातील गुटखा तस्करी पुन्हा एकदा चर्चेत आली असून ‘हिरा’ गुटख्याच्या उत्पादकावरच गुन्हा दाखल होवूनही त्याच्या ‘वितरणाला’ कोणताही धक्का लागला नसल्याचे सिद्ध झाले आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.30) सकाळच्या सत्रात पोलिसांनी दुचाकीवरुन गुटखा वाहून नेणार्या दोघांवर वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. त्यातील पहिल्या कारवाईत अकोले नाक्यावरुन दुचाकीच्या पुढील भागात (क्र.एम.एच.17/ए.वाय.546) हिरा पान मसाल्याची 6 हजार 480 रुपये मूल्याची 54 पाकिटे व रॉयल 717 सुगंधी तंबाखूची 1 हजार 620 रुपयांची तितकीच पाकिटे असा एकूण 8 हजार 100 रुपयांचा माल घेवून निघालेल्या पद्मनगरमधील नरसय्या रामदास पगडाल यांना पोलिसांनी हटकले असता त्यांच्याकडे वरीलप्रमाणे गुटखा आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कारवाई केली. या प्रकरणी पो.कॉ.सुरेश मोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपाससहाय्यक निरीक्षक रोहिदास माळी यांच्याकडे देण्यात आला आहे.

दुसर्या प्रकरणातील कारवाई देखील अकोले रस्त्यावरच करण्यात आली आहे. साईश्रद्धा चौकातील जी.ए.राठी हा तरुण आपल्या मोपेडवरुन (क्र.एम.एच.17/बी.टी.1691) 4 हजार 800 रुपयांचा हिरा पान मसाला व 1 हजार 200 रुपयांची रॉयल 717 सुगंधी तंबाखू घेवून जात असताना त्याला पकडण्यात आले आहे. त्याच्याकडील माल व वाहन जप्त करुन त्यालाही अटक करण्यात आली असून या प्रकरणाची फिर्याद पो.कॉ.अविनाश बर्डे यांनी दिली असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात श्रीरामपूर पोलिसांनी एकलहरे परिसरात केलेल्या कारवाईत 54 लाखांचा गुटखा आढळून आला होता. मात्र त्यानंतरचा तपास ठप्प झाल्याने तत्कालीन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट संशयाच्या गर्तेत आले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्याकडून तपास काढून घेत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्याकडे सोपविला. त्यांनी अवघ्या दोनच दिवसांत जिल्ह्यातील गुटखा तस्करीच्या मूळात जावून हिरा गुटख्याचा उत्पादक अस्लम शेख व पिंपरी चिचंवडमध्ये राहणार्या शहबाज या वाहतुकदारावरच गुन्हा दाखल करुन ‘हिरा’ गुटख्याचा मालकच राज्यभर गुटख्याची तस्करी करीत असल्याचे सिद्ध केले होते.

मात्र गुटख्यातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल लक्षात घेता त्यानंतरचा पुढील तपासच समोर न आल्याने जिल्ह्यातील गुटखा तस्करी म्हणजे एक ‘कोडं’ बनून राहिली आहे. मात्र संगमनेर पोलीस ठाण्याचा पदाभार हाती घेताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी गुटखा तस्करीकडे लक्ष केंद्रीत केले असून शहरातील गुटख्याचे पुरवठादार व वितरक अशा दोहींचे शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे सत्र सुरु केले आहे. या मोहिमेतंर्गत आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून जवळपास दीड लाख रुपयांचा गुटखाही जप्त करण्यात आला आहे. एकीकडे या कारवाईचे समर्थन होत असताना दुसरीकडे गुटख्याचा मुख्य उत्पादक समोर येवूनही त्याच्यावरील कारवाई प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील गुटखा तस्करी संगमनेरातील कारवाईने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

जिल्ह्यातील गुटखा तस्करीत संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील गुटखा तस्कर संतोष डेंगळे यांचा मोठा हात आहे. मात्र श्रीरामपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेथून अगदीच किरकोळ माल जप्त झाल्याने या कारवाईवरच शंका निर्माण झाल्या होत्या. शहर पोलिसांनी गेल्या चार दिवसांत केलेल्या कारवाईत तिघा फेरीवाल्यांसह एका पुरवठादाराला अटक केली आहे. मात्र त्यांच्यापर्यंत ‘ठोक’ पद्धतीने माल पोहोचवणारा अद्यापही पडद्याआड असल्याने शहर पोलीस तपासातून नेमकं कुठपर्यंत पोहोचतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

