नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारात डासांचा उपद्रव भंगार साहित्यांमुळे पोलीस व नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नायक वृत्तसेवा, नेवासा
सर्वत्र डेंग्यू, मलेरियाची साथ जोरात असताना नेवासा तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या आवारातील भंगार साहित्यामुळे पोलीस व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पावसाच्या पाण्यामुळे साचलेले डबके, डासांचा उपद्रव व दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र केवळ नेवासा पोलीस ठाण्याचेच नसून, तालुक्यातील तीन पोलीस ठाणी व चार पोलीस दूरक्षेत्रांतही आहे. डासांनी पोलीस ठाणे, तहसील कार्यालयात आश्रय घेतल्याने अधिकारी, कर्मचारी व तेथे ये-जा असलेले फिर्यादी, साक्षीदार, पंच, जामीनदार यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
नेवासा पोलीस ठाण्यासह तालुक्यातील सोनई, शनिशिंगणापूर या पोलीस ठाण्यांबरोबरच कुकाणे, प्रवरासंगम या पोलीस दूरक्षेत्रांना भेट दिल्यास, आवारात मोठ्या प्रमाणात जप्तीतील वाहने दृष्टीस पडतात. वर्षानुवर्षे तेथील दुचाकी वाहने, दारूचे डबे, चारचाकी वाहने व त्यात साचलेले पावसाचे पाणी साथरोगांचे उत्पत्ती स्थळ बनत आहे. या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डास, अळ्यांचे वास्तव्य असल्याचे पाहायला मिळत आहे. भंगार साहित्याची अशीच स्थिती राज्य उत्पादनशुल्कसह इतर शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळत आहे. हिवताप निर्मूलन विभागाने आपल्या मोहिमेचा प्रारंभ शासकीय कार्यालयांपासूनच करावा, अशी स्थिती आहे.
नेवासा पोलीस ठाणे व हद्दीतील सर्व पोलीस दूरक्षेत्रांच्या आवारातील जप्त वाहनांच्या (भंगार) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, या वाहनांचा लवकरात लवकर लिलाव होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
– बाजीराव पोवार (पोलीस निरीक्षक, नेवासा)