देवळाली प्रवरा परिसरात साथीच्या आजारांचा फैलाव आरोग्य यंत्रणा कोरोनात व्यस्त; लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात ऐन पावसाळ्यात चिकनगुणिया, डेंग्यू, हिवताप यांसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. साथीच्या आजाराच्या विळख्यात अनेक नागरिक सापडले आहेत. या आजारावर उपचार घेण्यासाठी नागरिक राहुरी, श्रीरामपूर येथे वैद्यकीय मदत घेण्यासाठी दाखल झाले आहेत. या उद्भवलेल्या परिस्थितकडे आरोग्य यंत्रणेचे अजिबात लक्ष दिसत नाहीये. आरोग्य यंत्रणा कोरोना लसीकरणामध्ये व्यस्त असल्याचे दाखवून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार त्वरीत थांबवून साथीच्या आजाराकडे लक्ष घालावे. अन्यथा आरोग्य यंत्रणेला जाग येण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा नागरिकांच्यावतीने देण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व गावागावात कोरोना महामारीने कहर केला होता. मात्र, कोरोनाच्या नावाखाली परिसरातील आरोग्य यंत्रणा निर्ढावलेल्या अवस्थेचे चित्र परिसराला पहायला मिळत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरु असलेल्या कधी दमदार तर कधी रिमझिम पावसाने परिसरातील वाड्यावस्त्यांसह शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत व रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. तर अनेक ठिकाणी डबक्यात पाणी साचलेले आहे. त्यातच पावसाच्या पाण्याची त्यात भर पडत असल्याने यामध्ये डासाचे थवेच्या थवे निर्माण झाले आहेत. परिसरातील दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी डासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.
परिसरातील शेटेवाडी, कारवाडी, इस्लामपुरा, गणेशनगर, लाखवाट, मुसमाडे वस्ती, भांड, सांगळे वस्ती, गणपती चौक, कदम वस्ती, बिरोबानगर, देवळाली बंगला, राहुरी फॅक्टरी आदीसह परिसरात सर्दी खोकला, चिकनगुणिया, मलेरिया, हिवताप, डोकेदुखी, सांधेदुखी यांसारख्या आजाराने शेकडो रुग्ण आजारी पडले आहेत. शहरातील खासगी डॉक्टर व औषध विक्रेते या आजाराच्या विळख्यात सापडल्याने त्यांच्यावरच उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शहरासह परिसरासाठीची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली असून या यंत्रणेचे बारा वाजले आहेत.
नागरिकांच्या आरोग्याची वेळीच दखल घेण्यासाठी शहरात नगरपरिषद कार्यालयाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्राचा विस्तार मोठा आहे. याठिकाणी मोठा सेवक वर्ग कामाला असून, सर्व सोईसुविधा आहेत. परंतु येथे असलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या सेवेबाबत कायमच उदासीन असतात. औषधे व गोळ्यांची वाणवा असते. कायमच नागरिकांना बाहेर गोळ्या घेण्याचा येथील वैद्यकीय अधिकारी सल्ला देतात. मग शासनाकडून येणारी लाखो रुपयांची औषधे जातात कुठे? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. ठराविक काही कर्मचारी वगळता अनेक कर्मचारी उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम करताना दिसून येतात. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या साथीच्या आजाराचे आरोग्य यंत्रणेने शहरासह वाड्यावस्त्यांवर जाऊन आजारी व्यक्तीच्या रक्ताचे नमूने घेऊन तत्काळ उपाययोजना सुरु करावी.