चंदनापुरी घाटात ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने पलटी चालक गंभीर जखमी तर ट्रॅक्टरचेही मोठे नुकसान
नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात उतारावर आलेला असताना ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर महामार्गाच्या बाजूला पलटी झाला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघात गुरुवारी (ता.29) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडला आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उंबरी बाळापूर (ता.संगमनेर) येथील ट्रॅक्टरचालक अमोल राजेंद्र माळी (वय 27) हा संगमनेरच्या दिशेने येत होता. चंदनापुरी घाटातील हॉटेल साईप्रसाद येथे आला असताना उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने थेट महामार्गाच्या बाजूला पलटी झाला. यामध्ये चालक माळी याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, त्यास तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस आणि मृत्यूंजय दूत संदीप भागवत यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य केले. यामध्ये ट्रॅक्टरचेही मोठे नुकसान झाले असून, पोलीस पुढील कार्यवाही करत आहे.