पठारावरील जाधव कुटुंबाला एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने मदत
पठारावरील जाधव कुटुंबाला एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने मदत
आदिवासी प्रकल्प कार्यालय व पंचायत समितीने घरकुल मंजूर करावे ः प्रा.खरात
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सतेचीवाडी येथील आदिवासी जाधव कुटुंबियांचा निवारा नुकताच सततच्या पावसाने कोसळला आहे. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जीवनावश्यक वस्तूंसह संसारापयोगी साहित्यही शिल्लक राहिले नाही. मात्र, दैव बलवत्तर असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संसार उघड्यावर पडला आहे. याची दखल घेत नामदार बाळासाहेब थोरात मित्रमंडळ व एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने नुकतीच त्यांना किराणा व धान्याची मदत करण्यात आली आहे.
आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात यांनी जनसेवक अविनाश आव्हाड, प्रभाकर शेलार, रोहिदास नागरे, बाळकृष्ण गांडाळ यांच्यासमवेत सतेचीवाडी येथील नुकसानग्रस्त वामन जाधव कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेत मतदीचे साहित्य सुपूर्द केले. तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालय राजूर व पंचायत समिती संगमनेर यांनी प्राधान्याने घरकुल मंजूर करून त्यांना तातडीने निवारा उपलब्ध करून द्यावा असे आवाहन करुन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात यांच्या सहकार्याने त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आदिवासी सेवक खरात यांनी दिली.
या मदतीबद्दल वामन जाधव म्हणाले, महसूल मंत्री थोरात यांचे आदिवासी ठाकर समाजावर कायम प्रेम राहिले आहे. माझे घर पावसाने उध्वस्त झाले अशावेळी मदतीचा हात देणारे आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात यांनी यशोधन कार्यालय व एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने दिलेला किराणा, जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्याने मी भारावून गेलो आहे. तर नामदार थोरात आमच्या आदिवासींचे देव आहेत अशी भावना गोदाबाई जाधव यांनी व्यक्त केली. याप्रसंगी भागा काळे, भिकाजी जाधव, आनंदाबाई मधे, रोहिणी काळे, दीपक काळे, रेवजी काळे, नितीन आल्हाट आदी उपस्थित होते.