पर्यावरण संवर्धनासाठी झटणारे ‘वनपुरुष’ तुकाराम बाबा! पंचवीस विविध उपयोगी वृक्षांची लागवड ठरतेय शेतकर्‍यांसाठी आदर्श

नायक वृत्तसेवा, अकोले
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काही लोकांनी आपले जीवन व्यतीत केलेले असते. पर्यावरण म्हणजेच आपले जीवन समजून त्यासाठी निष्ठेने आयुष्यभर काम केलेले असते. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे मान्हेरे (ता.अकोले) येथील तुकाराम भोरु गभाले होय.

‘वनपुरुष’ म्हणून ख्याती असलेले तुकाराम बाबा यांनी आपल्या परिसरातील गावांमध्ये हिरवाई निर्माण व्हावी, पारंपारिक जंगलांचे जतन व्हावे व त्यात वृद्धी व्हावी यासाठी आपले जीवन व्यतीत केले आहे. सध्या ते शिक्षक म्हणून सेवानिवृत्त आहेत. परंतु निसर्गाची शाळा त्यांनी कधीही बंद होऊ दिली नाही. निसर्गाच्या शाळेत शिकत राहणे व समाजाला प्रेरित करत राहणे हेच ध्येय त्यांनी आयुष्यात ठेवलेले आहे.

बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने व सहभागाने त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी केलेले कार्य सर्वश्रृत आहे. सुमारे 20 ते 25 लक्ष विविध उपयोगी वृक्षांची लागवड आणि संवर्धन ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी केलेले आहे. मान्हेरे कोदणी, रंधा, लाडगाव, टिटवी, डोंगरवाडी, पिंपरकणे, आंबेवंगण अशा विविध गावांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने साग, बांबू, अकेशिया, काशिद, शिवन, आंबा, काजू, जांभूळ, सुबाभूळ यांचा समावेश होतो. तुकाराम बाबांनी स्वतःचे माळरान ज्या पद्धतीने वृक्षवेलींनी सजवले आहे ते बघता स्थानिक शेतकर्‍यांना एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे. आंबा, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, रामफळ, ब्राझिलियन चेरी, केळी, हिरडा, बेहडा, जांभूळ, साग, बांबू, ऐन, चंदन, सादडा, खैर, सीसम, अर्जुन, काटे सावर, बहवा, शिंधी, बेल अशा कितीतरी प्रकारच्या वनस्पतींचे त्यांनी स्वतःच्या शेतावर संवर्धन केले आहे. यासोबतच अनेक औषधी वनस्पती त्यांचा शेतावर संवर्धित केलेल्या आहेत. यामध्ये गावठी शतावरी, अडुळसा, निर्गुडी, गावठी हळद, रानकेळी, चितृक, चिचूर्डा, नागफणी यांसह अनेक वनस्पतींचा यात समावेश होतो.

याशिवाय त्यांनी दालचिनी, मिरे यांसारखे मसाल्याचे पीक शेतावर यसस्वी करून दाखवले आहे. विविध वनस्पतींच्या सान्निध्यात वनराजीने नटलेल्या जागेवर आजही त्यांचे वास्तव्य आहे. गुरुजी मोठ्या आनंदाने वृक्ष लागवडीबद्दल विद्यार्थी, शिक्षक गावातील तरूण, बचत गटातील महिला, विविध विकास करणार्‍या यंत्रणा यांना आजही मोठ्या उत्साहात मार्गदर्शन करत असतात. शेतावर लावलेली झाडे म्हणजे आपले निवृत्ती वेतन आहे असे ते स्वाभिमानाने सांगतात. शेतावर लावलेल्या फळझाडांच्या माध्यमाने त्यांना जीवन चरितार्थ चालवणे सुखकर झाले आहे. गुरुजींनी उभे केलेले वन आणि फळ शेतीचे मॉडेल आजूबाजूच्या शेतकर्‍यांसाठी उत्तम उदाहरण म्हणता येईल. तुकाराम बाबांनी सुरू केलेले हे मिशन तरुणांनी नक्की पुढे नेले पाहिजे हीच त्यांची अपेक्षा आहे.

Visits: 139 Today: 1 Total: 1112410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *