विसर्जनासाठी थेट नदीपात्रात प्रवेश नाहीच! प्रशासन सज्ज; शहरासह नदीपात्रालगत पोलिसांचा खडा पहारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी साध्या पद्धतीने साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाची रविवारी सांगता होत आहे. नदीपात्रात असलेले प्रचंड खड्डे आणि कोविड नियमांची अंमलबजावणी या कारणाने संगमनेर नगरपालिकेसह पोलीस प्रशासनाने नदीपात्राला अडथळ्यांचे कठडे उभे केले असून कोणालाही थेट नदीपात्रात जावून विसर्जन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालिकेने शहरात चार ठिकाणी कृत्रित हौदासह सोळा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले आहेत. त्याशिवाय पोलिसांनी नदीपात्रालगतच्या तीन विसर्जन ठिकाणांसह शहरातील चौदा ठिकाणी बंदोबस्ताचे नियोजन केले असून गस्ती पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. नियमांची पायमल्ली करुन विसर्जन करण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या निळवंडे धरणातून अवघा 660 क्युसेक्सचा विसर्ग सुरु असल्याने नदीपात्रात गणेशमूर्तींचे संपूर्ण विसर्जन होईल का हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यताही या निमित्ताने समोर आली आहे.

गेल्या वर्षीपासून राज्यभरात ठाण मांडून बसलेल्या कोविडचे संक्रमण अद्यापही आटोक्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच धार्मिक, सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई आहे. त्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात आला असून रविवारी (ता.19) भक्तांच्या लाडक्या बाप्पांना साध्या पद्धतीनेच निरोप द्यावा लागणार आहे. संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमण अद्यापही भरात असून जिल्ह्यातील सर्वाधीक रुग्ण सापडणार्‍या तालुक्यात आजही संगमनेर प्रथमस्थानी आहे. त्यामुळे अन्य ठिकाणच्या तुलनेत विसर्जनाच्या निमित्ताने नदीकाठी गर्दी करणार्‍या संगमनेरकरांनी अधिक सजगपणे वावरण्याची गरज आहे.

नदीपात्रात झालेले प्रचंड खड्डे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध यामुळे प्रशासनाने त्या दृष्टीकोनातून जय्यत तयारी केली आहे. संगमनेर नगर पालिकेने नदीकाठावर गर्दी होवू नये यासाठी शहरातील जाणता राजा मैदान, स.म.भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलासमोरील पटांगण, विठ्ठलनगर येथील पटांगण व रंगारगल्लीतील रणजीत स्पोर्टस् क्लबच्या पटांगणात कृत्रिम हौद तयार केले आहेत. याठिकाणी जलप्रदुषणाबाबत जागृत असलेल्या नागरिकांसाठी गणेश मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील विविध सोळा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रही सुरु असणार आहेत. या ठिकाणी नागरिक आपल्या बाप्पांची मूर्ती श्रद्धापूर्वक पालिकेच्या कर्मचार्‍यांच्या हाती सोपवून घरी जावू शकता. सायंकाळी उशीराने एकत्रित होणार्‍या सर्व मूर्ती कर्मचार्‍यांकरवी नदीपात्रात विसर्जित केल्या जाणार आहेत.

गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे प्रवरा नदीपात्रात जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. त्यातून दरवर्षीच्या गणेशोत्सवाला दुःखाची किनार मिळत गेली. गेल्या वर्षी प्रशासन आणि पत्रकार यांच्या सुसंवादातून विसर्जनाबाबतचे नियोजन केले गेल्याने प्रवरानदीपात्रातून सहा हजारांहून अधिक क्युसेक्सने पाणी वाहत असतांनाही संगमनेरात आदर्श विसर्जन घडले, आणि अनेक वर्षांच्या दुख:द् वार्तेला खंड पडला. त्याच पद्धतीचे नियोजन यावर्षीही करण्यात आले असून संपूर्ण नदीपात्रातच धोकादायक बनल्याने नागरिकांनी स्वहस्तेच विसर्जन करण्याचा अट्टाहास न करता विसर्जनस्थळी भक्तिभावाने आधि समर्पित भावनेने कार्य करीत असलेल्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह रोटरी क्लब व लायन्स क्लब या संघटनांनी केलेल्या व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संगमनेर नगरपरिषद आणि शहर पोलिसांनी केलेल्या संयुक्त नियोजनानुसार चंद्रशेखर चौकातील साटमबाबांच्या मठापासून पुढे प्रवरापात्राकडे जाण्यास अटकाव करण्यात येणार आहे. याठिकाणी विसर्जनासाठी आलेल्या बाप्पांना स्वयंसेवकांच्या हाती सोपवावे लागेल. साईमंदिराकडून जाणार्‍या रस्त्यावरही तेथील मठाच्या समोर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी स्वयंसेवकांकडूनच गणेश मूर्तींचे विसर्जन होईल. यासोबत कासारवाडी रस्त्याने मालपाणी हेल्थ क्लबकडून येणार्‍या रस्त्यावरही अशाच पद्धतीने अटकाव करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी विसर्जनासाठी आणलेल्या मूर्ती स्वयंसेवकांना सोपवाव्या लागणार आहेत. याठिकाणी कोणतीही गडबड होवू नये यासाठी पालिकेच्या कर्मचार्‍यांसह शहर पोलिसांनी विसर्जनाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर एका अधिकार्‍यांसह प्रत्येकी पंधरा कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. यात महिला पोलीस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.

यासोबतच शहरातील सोळाही ठिकाणच्या संकलन केंद्रांसह चार ठिकाणच्या कृत्रिम हौदाजवळही मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय शहरातील चौदा ठिकाणी सुसज्ज अवस्थेत फिक्स पॉईंटही रेखांकीत करण्यात आले आहे. शहर पोलिसांच्या दोन वाहनांतून शहरात एकसारखी गस्त सुरु असणार आहे. नियम तोडून विसर्जन मिरवणूक काढणार्‍या समूहाचे छायाचित्रण करण्यासाठी गस्तीपथकातील वाहनात व्हिडिओ कॅमेराही देण्यात आला आहे. जवळपास शंभरावर कर्मचारी चार अधिकारी, एक पोलीस निरीक्षक व पोलीस उपाधीक्षक इतका मोठा बंदोबस्त यासाठी वापरण्यात आला आहे. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करुन उत्साहात आपल्या बाप्पांना निरोप देण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


कोविडच्या अनुषंगाने उत्सवांसंदर्भात राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याला अनुसरुन यावर्षीचा गणेशोत्सव आत्तापर्यंत शांततेत आणि भक्तिभावाने साजरा झाला आहे. विसर्जनही अशाच पद्धतीने पार पडेल असा विश्वास आहे. या दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून त्याकामी चार अधिकार्‍यांसह शंभर कर्मचारी कार्यरत असणार आहेत. नागरिकांनी थेट नदीपात्रात जाण्याचा आग्रह न करता विसर्जन प्रवेशमार्गावरील स्वयंसेवकांकडे गणेश मूर्ती सोपवाव्यात. त्यांच्याकडून सर्व मूर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. कोणीही मिरवणूकीने बाप्पांना विसर्जनासाठी नेवू नये.
मुकुंद देशमुख
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर


अनियमित नदीपात्र आणि विसर्जनाच्या दिवशी घडणार्‍या बुडिताच्या घटना यामुळे गेल्या वर्षीपासून गणरायांच्या विसर्जनाची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सुयोग्य नियोजन केलेले आहे, त्यानुसार प्रवेशद्वारावरच आपल्या मूर्ती विश्वासाने आमच्या हाती सोपवा. आपण वर्षभर, दहा दिवस पूजलेला बाप्पा आम्हीही तितक्याच भक्तिभावाने आणि श्रद्धेने अगदी सामुहिक आरती केल्यानंतरच विसर्जित करणार आहोत. कृपया थेट नदीपात्रात जावून विसर्जन करु नका, खड्ड्यांमुळे यापूर्वी अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
सचिन कानकाटे
समन्वयक, बजरंग दल

Visits: 192 Today: 1 Total: 1420927

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *