भंडारदरा येथील पर्यटन मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद आदिवासी तरुणांच्या रोजगारासह संवाद कौशल्यात होणार वृद्धी

नायक वृत्तसेवा, राजूर
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव भंडारदरा यांच्या संयुक्त विद्यामाने भंडारदरा परिक्षेत्रात आदिवासी तरुणांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे सध्या पर्यटन काळात तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार असून, संवादाचे कौशल्य अधिक वृद्धिंगत करण्यास मदत होणार आहे.

कोरोना परिस्थितीमधे पर्यटन व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सध्या कोरोनाचे सावट हळूहळू कमी होत असताना पर्यटनावर पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणार्‍या आदिवासी तरुणांना मार्गदर्शक (गाईड) म्हणून तांत्रिक शिक्षण मिळावे व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरासाठी वन्यजीव विभागाचे गणेश रणदिवे, अमोल आडे, डी.डी.पडवळे, अशोक काळे, माजी प्राचार्य डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डीचे प्राचार्य डॉ. मोहन वामन उपस्थित होते. आदिवासी म्हणजेच जंगलामध्ये राहणारे रांगडे, राकट, काटक लोक, अशा लोकांमध्ये जन्मतः असणार्‍या सुप्त गुणांना योग्य ते वळण मिळावे व मार्गदर्शक (गाईड) म्हणून काम करून त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटण्याच्या दृष्टीकोनातून वन विभागाकडून अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

या शिबिरात आदिवासी तरुणांनाना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी येथील औषधी वनस्पतींची ओळख कसी करावी, त्याचे फायदे काय, औषधी झाडपाला, दुर्मिळ वनस्पती या नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न जंगलाची आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन कसे करावे याविषयी माहिती दिली. वन अधिकारी डी. डी. पडवळे यांनी पर्यटन क्षेत्रात गाईड म्हणून काम करताना पर्यटकांची काळजी कसी घ्यावी, त्यांना लागणार्‍या सोयी-सुविधा कशा उपलब्ध करून देण्यात याव्यात, तसेच पर्यटकांशी संवाद कसा साधावा याविषयी मार्गदर्शन केले. स्वागत वन अधिकारी पडवळे यांनी केले तर आभार अमोल आढे यांनी मानले.

Visits: 87 Today: 1 Total: 1113524

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *