जांबुत बुद्रुकमध्ये वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले अहमदनगरच्या गौण खनिज पथकाची कारवाई; स्थानिक प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नदीपात्र वाळूतस्कर अक्षरशः ओरबाडून काढत आहे. स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे वाळू उपसा करुन अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात विक्री करत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून मुजारे वाहूतस्कर स्थानिक नागरिकांना देखील जुमानात नाहीत. अवजड वाहनांद्वारे वाहतूक होत असल्याने रस्त्यांची देखील वाट लागली आहे. महसूल व पोलीस छातून-मातूर कारवाई करुन सोडून देतात. यामुळे तस्करांचे चांगलेच फावते. यापूर्वी अहमदनगर व नाशिकच्या गौण खनिज पथकाने कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा गुरुवारी (ता.9) रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास जांबुत बुद्रुकमध्ये चोरटी वाळूची वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. यावेळी अधिकार्यांना पाहून वाळूतस्करांनी धूम ठोकली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, जांबुत बुद्रुक परिसरातील सय्यद बाबा मंदिर येथून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा गौण खनिज पथकाला समजताच सय्यद यांच्यासह मंडलाधिकारी इरप्पा काळे, तलाठी भालचंद्र वैद्य, विक्रम ओतारी, केशव शिरोळे यांच्या पथकाने गुरुवारी (ता.9) रात्री ही कारवाई केली. यावेळी पथकाला पाहून वाळूतस्करांनी डंपर जागेवरच सोडून धूम ठोकली. त्यानंतर पथकाने दोन्ही डंपर घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावले. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पठारभागातून वाहणार्या मुळा नदीत वाळूचे मोठे प्रमाण आहे. ठिकठिकाणी वाळू तस्करांनी नदीचे पात्र उजाड केले आहे. महसूल व पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचार्यांनी आर्थिक मिलीभगत असल्याने अनेकदा छातूर-मातूर कारवाई करुन वाहने सोडून देतात. तर कारवाई करुन पुढारी हस्तक्षेप करत असल्यानेही अधिकार्यांना नाईलाजास्तव वाहने सोडावी लागतात. यामध्ये सामान्य नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो. अवजड वाहनांतून वाळू वाहतूक होत असल्याने जांबुत बुद्रुक ते खैरदरा, जांबुत ते नांदूर या रस्त्यांची देखील पुरती वाट लागली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या रस्त्यांची कामे झाली आहे. मात्र, वाहतुकीने परिसरातील नागरिक वैतागले आहेत. याबाबत आवाज उठवूनही काहीही फायदा होत नसल्याने समस्या मांडावी तरी कोणाकडे असा सवाल करत आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलून वेळीच मुजोर वाळू तस्करांना आवर घालणे गरजेचे आहे.
चोरुन वाळूची वाहतूक करणार्या अनेक वाहनांवर क्रमांक नसतो. जरी वाहन पकडले तरी क्रमांक अधिकार्यांना दिसू नये म्हणून खोडून टाकतात. यामुळे राज्य परिवहन विभागानेही याची दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा वाळू तस्करांची मुजोरी दिवसेंदिवस वाढून प्रशासनाला देखील जेरीस आणण्याची शक्यता आहे.