‘तनपुरे’ कामगार आंदोलन; राहुरी पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा काळे फासणार्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले; न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता

नायक वृत्तसेवा, राहुरी
प्रवरा कारखान्याच्या एका अधिकार्याच्या तोंडाला घातक केमिकलचे काळे फासल्याच्या गुन्ह्यातील तनपुरे साखर कारखान्याच्या सहा कामगारांना सोमवारी (ता.6) मध्यरात्री साडेअकरा वाजता राहुरी पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यामुळे मंगळवारी (ता.7) कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. राहुरी पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा घडला. प्रवरेच्या फिर्यादी अधिकार्याने माघार घेतल्याने अखेर प्रकरणावर पडदा पडला.

मागील पाच वर्षातील थकीत वेतन व इतर 25 कोटी 36 लाखांच्या मागणीसाठी तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी केलेले आंदोलन चौदाव्या दिवशी रविवारी (ता.5) माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मध्यस्थीने मागे घेतले. आंदोलनादरम्यान ‘तनपुरे’ च्या कामगारांनी प्रवरेचे हिशोबनीस अविनाश खर्डे यांच्या तोंडाला काळे फासले. त्यामुळे खर्डे यांच्या तक्रारीवरून, घातक पदार्थाने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ‘तनपुरे’च्या कामगारांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. इंद्रभान भाऊसाहेब पेरणे (वय 56, रा.तांदुळवाडी), सचिन गोपाळराव काळे (वय 40), सीताराम शिवराम नालकर (वय 53), नामदेव बापू शिंदे (वय 35), बाळासाहेब माधव तारडे (वय 53, चौघेही रा.राहुरी फॅक्टरी), सुरेश पाराजी तनपुरे (वय 57, रा.स्टेशन रोड, राहुरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आंदोलन मिटविताना कामगारांवरील गुन्ह्यात वादी-प्रतिवादी यांच्या सामोपचाराने प्रश्न सोडविला जाईल. असे कारखाना प्रशासनाने दिलेल्या लेखी प्रस्तावात नमूद केले होते. मंगळवारपासून सर्व कामगारांना कामावर रुजू होण्याचा आदेश दिला होता. परंतु, सहा कामगारांना मध्यरात्री पोलिसांनी अटक केल्याचे समजताच कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. कारखाना प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमून, शंभरावर कामगारांनी राहुरी पोलीस ठाणे गाठले.

सकाळी साडेनऊ वाजता आमदार शिवाजी कर्डिले, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे, खासदार डॉ. सुजय विखे यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्याशी चर्चा केली. फिर्यादी अविनाश खर्डे यांनी पोलीस ठाण्यात हजर होऊन, सिड किंवा केमिकल पदार्थ तोंडाला लावला नव्हता. गैरसमजातून तणावाखाली लोणी येथे ग्रामीण रुग्णालयात जबाब दिला, असा पुरवणी जबाब पोलिसांना लिहून दिला. राहुरी न्यायालयाने सायंकाळी उशिरा सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता केली.

तनपुरे साखर कारखान्यात कधीही राजकारण केले नाही. शेतकरी, कामगारांच्या हिताच्या दृष्टीने कायम मदत केली. कामगारांचे आंदोलन माझ्या मध्यस्थीने मिटल्याने दुखावून कामगारांना अटक करण्याची कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले काय? याचा शोध घ्यावा लागेल, असे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी कामगारांसमोर बोलताना सांगितले. यावेळी त्यांचा रोख राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर होता.
