अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्री फक्त शोभेच्या बाहुल्या ः विखे सोनगावमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन; राज्य सरकारवर केली जोरदार टीका

नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कोणालाही नोकर्‍या देण्यासाठी किंवा बदल्या करण्याचे भाव हॉटेलमधील मेनू कार्डप्रमाणे ठरले आहेत. सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले आहेत, असा आरोप करतानाच अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्री फक्त शोभेच्या बाहुल्या ठरल्या आहे, अशी टीका माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

कोरोनाच्या काळात राज्यसरकारने लोकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार मदत देत नसल्याचा कांगावा करीत आहे. आम्ही मात्र कोरोना सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना आधार दिला. अशावेळी राज्यातील मंत्री फक्त भजे खाण्यासाठीच बसलेत काय, असा प्रश्नही विखे पाटील यांनी विचारला. सोनगाव (ता. राहुरी) ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळा-प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक सुभाष अंत्रे होते. यावेळी अ‍ॅड. आप्पासाहेब दिघे, रमेश पन्हाळे, सुभाष ना. अंत्रे, पाराजी धनवट, जे. पी. जोर्वेकर, सोनगावचे सरपंच अनिल अनाप, सात्रळचे सरपंच सतीष ताठे, उपसरपंच किरण अंत्रे, कारभारी ताठे, साहेबराव नालकर, मच्छिंद्र अंत्रे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार विखे पाटील म्हणाले, आघाडी सरकारला कोणतेही चांगले काम करता आले नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी वित्त आयोगाचा निधी रुग्णवाहिकासाठी वळविला. त्याला आमचा आक्षेप नाही, परंतु वित्त आयोगाचे पैसे पक्षासाठी व कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी वापरणे एवढेच काम पालकमंत्र्यांनी केले, यासारखे दुर्दैव नाही. निधी मिळविण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला घटनेने दिला आहे. त्यांना हात लावण्याचा कोणाला अधिकार नाही, असे विखे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्याशाप देण्यापलीकडे राज्य सरकार कोणतेच काम करत नाही. केंद्राने लस दिली म्हणूनच राज्य लसीकरणात पहिल्या क्रमांकावर गेले. सरकारने लाखो रुपयांची वीजबिले शेतकर्‍यांच्या माथी मारली. पीकविम्याची नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शाळा सुरू करण्याबाबत मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. धोरण समाजाला पूरक नसलेल्या सरकारला जनता आता नापास केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विखे पाटलांनी दिला. यावेळी राजेंद्र अनाप, नारायण धनवट व मौलाना रऊफ आदिंची भाषणे झाली. प्रास्तविक पाराजी धनवट यांनी केले. सूत्रसंचालन साहेबराव अनाप यांनी केले. किरण अंत्रे यांनी आभार मानले.


लॉकडाऊन हेच राज्य सरकारचे धोरण..
चांगले काम करीत असल्याचा डांगोरा पिटणारे राज्य सरकार अधिवेशन घेऊन चर्चेला का तयार होत नाही, असा सवाल करून आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अधिवेशन घेण्याची वेळ आल्यावर लगेचच कोरोनाचे आकडे कसे वाढतात. सरकारला कोविड हे हत्यार सापडले आहे. लॉकडाऊन हेच राज्य सरकारचे एकमेव धोरण आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 119210

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *