धक्कादायक! संगमनेरातील तरुण महिला डॉक्टरची आत्महत्या..! घरात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; पोलिसांकडून तपास सुरु..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

संगमनेर शहरातील प्रसिद्ध बाल रोगतज्ज्ञ डॉ.योगेश निघुते यांच्या पत्नी डॉक्टर पुनम यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संगमनेरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत महिला डॉक्टरच्या नातेवाईकांच्या भूमिकेनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. एका शांत आणि संयमी स्वभावाच्या महिला डॉक्टरने अशा पद्धतीने आपले जीवन संपवल्याने संगमनेरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावरील ताजणे मळा परिसरात असलेल्या चिरायु रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सदरची घटना घडली. डॉक्टर पुनम योगेश निघुते (वय 35) यांनी रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावरील निवासस्थानात आपल्या खोलीतील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत दत्तात्रय जोंधळे यांनी दिलेल्या खबरी वरुन शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत पूनम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी अथवा संदेश मागे सोडल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली असावी हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरपालिकेच्या कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाच्या डॉक्टर पुनम यांनी संगमनेर नगरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातही काहीकाळ सेवा केली होती. एम.बी.बी.एस पर्यंत शिक्षण घेतलेल्या डॉक्टर पुनम यांनी गेल्यावर्षी प्रवरा मेडिकल कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविला होता. सध्या त्या तेथूनच उच्च शिक्षण घेत होत्या. आज सायंकाळी अचानक त्यांच्या आत्महत्येचे वृत्त येऊन धडकल्याने अनेकांना मोठा धक्का बसला. त्यांच्या बॅचच्या सर्व डॉक्टरांना अद्यापही डॉक्टर पुनम यांनी आत्महत्या केली या वृत्तावर विश्वास बसत नसल्याचेही दिसून आले. एका निष्णात तरुण महिला डॉक्टरने अशा पद्धतीने आपली जीवनयात्रा संपविल्याने संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत डॉक्टर पुनम यांच्या नातेवाईकांच्या भूमिकेनुसार पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. सद्यस्थितीत अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सहाय्यक फौजदार रफियोउद्दीन शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Visits: 211 Today: 1 Total: 1109919

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *