शिक्षण आणि व्यायाम हिच निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली ः सावंत संगमनेर महाविद्यालयात महाराष्ट्र बँकेच्या दातृत्वातून खुल्या जिमचे उद्घाटन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
व्यापक समाजहित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी महाराष्ट्र बँक नेहमीच आघाडीवर राहिली असून शिक्षण आणि व्यायाम हिच निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर सूर्यकांत सावंत यांनी केले.

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने बँकेच्या दातृत्वातून संगमनेर महाविद्यालयातील क्रीडांगणावर व्यायामाची साधने उपलब्ध करून दिली आहेत. या खुला व्यायामशाळेचे उद्घाटन जनरल मॅनेजर सूर्यकांत सावंत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. तसेच व्यासपीठावर भगवान सूरसे, आहिल्या थोरात, ज्योती सावंत, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ सातपुते, खजिनदार राजकुमार गांधी, नरेंद्र चांडक, अनिल सातपुते, रवींद्र पवार, मधुसूदन नावंदर, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, डॉ. रवींद्र तशिलदार, प्रा. राजेंद्र ढमक, क्रीडा संचालक डॉ. अजितकुमार कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर त सावंत म्हणाले, महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर व्यायाम आणि आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. जीवनात शिक्षणाला महत्त्व आहे. पण शिक्षणाबरोबर शारीरिक संपदा सुद्धा खूप महत्त्वाची आहे म्हणून नेहमी व्यायाम करणारी माणसे निरोगी राहतात. पूर्वीपासून महाराष्ट्र बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. त्यामुळे तळागाळातल्या लोकांना सदैव मदतीचा हात बँकेमार्फत दिला जातो. देशाच्या प्रगतीसाठी साहाय्यभूत होणार्‍या अनेक योजना राबविल्या जातात. देशात आणि परदेशात शिक्षण घेणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्याचा प्रयत्न बँकेने अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात केलेला आहे. पैशांअभावी कोणाचे शिक्षण थांबू नये, असेही यावेळी बोलताना सावंत म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रा. डॉ. अजितकुमार कदम यांनी मानले. सदर कार्यक्रम संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर फीत कापल्यानंतर साईबाबा सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 93 Today: 1 Total: 1111177

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *