भाजपाचे नारायण राणेंच्या समर्थनार्थ निवेदन! सत्ताधार्‍यांकडून पोलिसांचा दुर्दैवीपणे गैरवापर सुरु असल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रायगड जिल्ह्यातील महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत वादग्रस्त विधान केले होते. त्याचा परिणाम राज्यात विविध ठिकाणी निषेध व आंदोलने होण्यात झाला व अनेक ठिकाणी राणेंविरोधात गुन्हेही दाखल झाले. त्यातून महाड पोलिसांनी मंगळवारी त्यांना अटक करुन नंतर जामिनावर त्यांची सुटकाही केली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी स्थानिक शिवसेनेने आंदोलन करीत बसस्थानकातील स्वच्छतागृहाला राणेंचे नाव दिल्यानंतर आज भारतीय जनता पक्षानेही निवेदन देत नारायण राणेंच्या अटकेचा निषेध करीत सत्ताधारी आघाडी पोलिसांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला. त्यासोबतच शिवसेनेचा उल्लेख ‘सोनिया सेना’ करुन नव्या वादालाही फोडणी दिली आहे. यावर सत्ताधारी गटाकडून कोणत्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

सोमवारी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख अत्यंत वादग्रस्त वक्तव्यही केले होते. त्याचा परिणाम राज्यभरातील शिवसैनिक संतप्त होण्यात झाला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील युवासेनेने राज्यभर निदर्शने करीत मुंबई, पुणे व नाशिक येथील भाजपच्या कार्यालयांवरही हल्ला चढवला. राज्यातील अन्य ठिकाणीही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता.

नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी संगमनेर शिवसेनेने बसस्थानक परिसरात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी बसस्थानकातील स्वच्छतागृहाला नारायण राणे यांचे नाव देत आपला रोषही व्यक्त केला होता. या आंदोलनानंतर लागलीच स्थानिक भारतीय जनता पक्षानेही नारायण राणेंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच पोलिसांनी शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला होता. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकार्‍यांना निवेदन सोपविले.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्यावर झालेली टीका सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारु शकत नाही. मात्र त्यांचे नेते व कार्यकर्ते इतर राजकारण्यांवर व विरोधकांवर शेलकी भाषेत सतत टीका करीत असतात. सत्ताधार्‍यांकडूनच मुस्काडीत मारण्याची भाषा करतात, मात्र त्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिले तर सोनिया सेना भडकते व लागलीच सत्तेचा वापर करुन पोलीस यंत्रणेचा खासगी वापर केल्यागत गुन्हे दाखल करुन अटकेची कारवाई केली जाते. सरकारकडूनच पोलीस यंत्रणेचा होणारा हा दुरुपयोग अत्यंत दुर्देवी असल्याचेही या निवेदनातून सांगण्यात आले आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना पोलिसांनी ज्या पद्धतीने अटक केली व त्या दरम्यान जी अपमानास्पद वागणूक दिली ती अत्यंत निषेधार्ह आहे. असेच प्रकार स्थानिक पातळीवरही सुरु असतात असे सांगत या निवेदनात सोशल माध्यमातून अथवा अन्य ठिकाणी सत्ताधारी गटावर विरोधकांकडून राजकीय टीका झाल्यास सोनिया सेनेचे कार्यकर्ते अशा हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यामार्फत त्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतात असा गंभीर आरोप करीत या सर्वांना समज देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आघाडी सरकारने केलेली कारवाई सुडबुद्धीतून झाल्याचा आरोप करीत या घटनेचा स्थानिक भारतीय जनता पक्ष निषेध करीत असल्याचेही या निवेदनातून सांगण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले, नगरसेविका मेघा भगत, सीताराम मोहरीकर, संतोष पठाडे, विकास गुळवे, रोहिदास साबळे, संजय वाकचौरे, विठ्ठल शिंदे, वैभव लांडगे, योगेश मांगलकर, किशोर गुप्ता, श्याम कोळपकर, दीपक ताटकर, शशांक वामन, मच्छिंद्र सोनवणे, आनंदा मोकळ, माधव थोरात, अमित गुप्ता, मनोज जुंद्रे, सोमनाथ कानवडे, शिवाजी आहेर, वरद बागूल, किरपाल डंग, विनायक कानकाटे, निलकंठ भडांगे, विलास रासकर, सुनील खरे, स्वप्नील उपासणी, शुभम बेल्हेकर, नानासाहेब खुळे, प्राजक्ता बागूल, शैलेश फटांगरे व स्वप्नील लोंढे आदी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Visits: 145 Today: 1 Total: 1794702

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *