पठारभागात चोरट्यांचा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज चोरीस पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोब§स्त करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, घारगाव
एकीकडे कोविडचे संकट, निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे चोर्या वाढल्याने पठारभागातील (ता.संगमनेर) नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत महागडी दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या चिचदरा येथून वैभव सुनील शेळके या तरुणाची 3 लाख 40 हजार रुपयांची स्पोर्ट बाईक अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केला. मंगळवारी (ता.24) सकाळी चोरी झाल्याचे शेळके यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घारगाव पोलिसांत धाव घेऊन दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं. 198/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार कैलास देशमुख हे करत आहे.
तर दुसर्या घटनेत सुमारे 25 हजार रुपयांचा मोबाईल अज्ञाताने लांबविला आहे. राकेश विलास डहाळे हे (रा. कुंभार गल्ली, साकूर) हा तरुण सोमवारी (ता.23) राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे गेला होता. सायंकाळी एका अनोळखी दुचाकीस्वाराची मदत घेऊन घरी (साकूर) परतत होता. त्यानंतर इच्छित स्थळी दुचाकीवरुन उतरल्यानंतर घराकडे पायी जाताना कुटुंबियांशी संपर्क साधण्यासाठी खिशात हात घातला असता मोबाईल व रोख रक्कम बाराशे मिळून आली नाही. याबाबत घारगाव पोलिसांत तक्रार दिल्यावरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शिंदोडी येथील यमाई टँक जवळील बंद असलेल्या मुक्ताई मंदिरासमोर दर्शनासाठी ठेवलेल्या पालखीतील अंदाजे 3 हजार 500 रुपयांची रक्कम व 3 हजार रुपये किंमतीचे अॅम्प्लिफायर चोरुन नेले. याबाबत म्हतू मना कुदनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सलग तीन दिवस चोरीच्या घटना घडल्याने कोविडच्या संकटात नागरिकांसह शेतकर्यांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
गेल्या काही दिवसांत पठारभागात झालेल्या चोर्यांचा तपास प्रलंबित असतानाच चोरटे आपला पुन्हा कार्यभार उरकण्यात दंग झाल्याने घारगाव पोलिसांसमोर त्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान ठाकले आहे. याचबरोबर अवैध धंद्यांचा बिमोड करण्याबाबतही कडक पावले उचलण्याची गरज आहे.