संगमनेर तालुक्यात दररोज वाढतायेत सरासरी पन्नास संक्रमित रुग्ण! गेल्या तीन महिन्यात शहराला मागे टाकीत 75 टक्के तालुक्यात पसरला कोविडचा संसर्ग

श्याम तिवारी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील तिघांसह आश्‍वी बु. येथील एका रुग्णापासून सुरु झालेले संगमनेर तालुक्यातील कोविडचे संक्रमण आज शहरातील प्रत्येक गल्ली-बोळासह तालुक्याच्या 75 टक्के भागात पसरले आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात किरकोळ रुग्णसंख्या असलेला तालुका गेल्या तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने कोविडच्या चक्रव्युहात अडकल्याने आजच्या स्थितीत एकुण रुग्णसंख्येतील 64 टक्के रुग्ण ग्रामीणभागातून समोर आलेत. गेल्या 26 ऑगस्टपासून कोविडच्या संक्रमणाचा वेगही वाढल्याने तालुक्यात दररोज सरासरी पन्नास नवीन रुग्णांची भर पडत आहे. तालुक्यातील रुग्णवाढीची श्रृंखला अशीच कायम राहील्यास या महिन्याच्या अखेरपर्यंत संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या तिसरे सहस्रक ओलांडून पुढे जाण्याचीही दाट शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकांराकडून वर्तविली जात आहे.


22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एक दिवसाचा जनता कर्फ्यु घोषीत केल्यानंतर देशवासियांना खर्‍याअर्थी कोविडची दाहकता समजली. त्यानंतर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर 24 मार्चपासून देशात सरसकट ‘लॉकडाऊन’ घोषीत झाला. त्या दरम्यानच जामखेड कनेक्शनच्या संशयावरुन संगमनेरातील नायकवाडपूरा भागातील पंधरा जणांसह तालुक्यातील आश्‍वी बु. येथील एकाची माहिती मिळाल्याने प्रशासनाने 30 मार्चरोजी एकुण सोळा जणांना ताब्यात घेवून त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले. दोन दिवसांनी म्हणजे 2 एप्रिलरोजी त्यातील नायकवाडपूरा परिसरातील तिघांसह आश्‍वी बु. येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या चौघांसह शहर व तालुक्यातील कोविडचे खाते उघडले गेले.


त्यानंतर 23 एप्रिलरोजी धर्मप्रसाराच्या माध्यमातून जिल्ह्यात आलेल्या व रहेमतनगरमधील एका तीन मजली इमारतीत वास्तव्यास राहीलेल्या 19 नेपाळी तबलिगींमधील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एप्रिलमध्ये तालुक्यातील एकासह शहरातील सातजण संक्रमित झाले. त्यानंतरही हा सिलसिला सुरुच राहीला व या महिन्याने एप्रिलच्या तुलनेत तब्बल चारपट अधिक रुग्णसंख्येची भर घातली. त्यासोबतच 7 मे रोजी धांदरफळ येथील 68 वर्षीय इसमाचा कोविडने बळी घेतला. संगमनेरच्या कोविड इतिहासात हा पहिलाच बळी ठरल्याने अवघा तालुका हादरला. त्या एकाच महिन्यात धांदरफळमधील ज्येष्ठासह निमोणमधील 57 व 54 वर्षीय इसम, डिग्रसमधील 52 वर्षीय महिला व शहरातील मदिनानगर मधील 55 वर्षीय इसमाच्या रुपाने एकाच महिन्यात पाच जणांचे बळी गेले. त्यासोबतच मे महिन्याच्या एकतीस दिवसांत शहरातील 15 जणांसह तालुक्यातील रुग्णसंख्येत 36 रुग्णांची भर पडली.


जूनमध्येही कोविड प्रादुर्भावाची गती नैसर्गिकरित्या होती. मात्र या महिन्याने शहर व तालुक्यातील सहा महिलांचे बळी घेतले. त्यात शेडगावमधील 63 वर्षीय, मोमीनपूर्‍यातील 63 वर्षीय, नायकवाडपूर्‍यातील 65 व 50 वर्षीय, मालदाड रोड परिसरातील 73 वर्षीय व राजवाडा भागातील 38 वर्षीय महिलेचा समावेश होता. या महिन्यात तालुक्याच्या तुलनेत शहरात 42 जणांना तर ग्रामीण भागात अवघ्या 23 जणांना कोविडची लागण होवून तालुक्याच्या रुग्णसंख्येत 65 रुग्णांची भर पडून एकुण रुग्णसंख्या 109 वर पोहोचली.


जुलैत मात्र अनलॉक 2.0 चा मोठा फटका संगमनेर तालुक्याला बसल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले. या एकाच महिन्यात तालुक्याच्या रुग्णसंख्येत साडेपाच पट वाढ झाली. त्यात ग्रामीणभागातील 381 रुग्णांसह शहरातील 269 अशा एकुण साडेसहाशे रुग्णांची भर पडली. त्यामुळे या महिन्याने तालुक्यातील कोविडचे चित्र चिंताजनक बनविण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. त्याशिवाय कासारा दुमाला येथील 87 व 58 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 59 वर्षीय इसम, शिबलापूरमधील 43 वर्षीय तरुण, कुरणमधील 45 वर्षीय तरुण, सय्यदबाबा चौकातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, श्रमिकनगरमधील 57 वर्षीय इसम व नायकवाडपूरा भागातील 71 वर्षीय ज्येष्ठ अशा सात जणांचा बळीही गेला. येथपर्यंतचा विचार करता या तारखेपर्यंत शहरासह तालुक्यातील 68 गावांमध्ये कोविडचा संसर्ग पसरला होता.


जुलैतील रुग्णवाढीच्या दरात प्रतीदिवस दहा रुग्णांची भर पडून ऑगस्टनेही संगमनेरकरांना दररोज धक्का देण्याचे तंत्र अवलंबिले. या एकाच महिन्यात तालुक्याच्या रुग्णसंख्येत 961 जणांची भर पडली, या महिन्याने तालुक्यातील ग्रामीभागातील स्थिती अधिक भयावह करतांना ग्रामीण रुग्णसंख्येत 603 रुग्णांची तर शहरीभागात 358 रुग्णांची भर घालीत तालुक्याला पहिल्या सहस्रकाच्या पल्याड नेवून थेट 1 हजार 720 वर पोहोचवले. यावरच हा प्रादुर्भाव न थांबता शहरातील मालदाड रोडवरील 81 वर्षीय व कुंभारआळा येथील 65 वर्षीय ज्येष्ठांसह निमोणमधील 75 वर्षीय, चिंचोली गुरवमधील 94 वर्षीय वयोवृद्ध, कर्‍हे येथील 55 वर्षीय, संगमनेर खुर्दमधील 44 वर्षीय इसमांसह सोनुशी येथील 51 वर्षीय महिलेचा बळीही घेतला. या एकाच महिन्यात तालुक्यातील 40 नव्या गावांमध्ये कोविडचा संसर्ग पोहोचला ही सर्वात धक्कादायक गोष्ट ठरली.


ऑगस्टपासून वाढलेल्या तालुक्याच्या सरासरी रुग्णवाढीच्या गतीला बरेच मागे ठेवून सप्टेंबर उगवला. या महिन्याचा पहिलाच दिवस अनंत चतुर्दशीचा. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधाच्या गराड्यात साजरा झाला, मात्र त्यामुळे बाप्पांच्या भक्तांचा उत्साह कोठेही कमी झाल्याचे दिसले नाही. एरव्ही सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आनंद लुटणार्‍या तरुणांनी यावर्षी घरगुती बाप्पांनाच व्यापक स्वरुप देत दहा दिवस जल्लोश केला आणि 1 सप्टेंबररोजी विसर्जनाचाही आनंद लुटला. मात्र या मंगलदिनीही कोविडचा विषाणू शांत बसला नाही. त्याने सायंकाळ होताहोता आपली दाहकता अधोरेखीत करतांना माळीवाड्यातील 70 वर्षीय इसमाचा बळी घेतला. या वृत्ताने दिवसभर उत्साहाने सुरु असलेल्या विसर्जनाच्या आनंदोत्सवाला वेदनेचे गालबोट लागले.


हा धक्का सहन होत असतांनाच तालुक्यातील 31 जणांसह तालुक्याच्या रुग्णसंख्येत 42 जणांची भरही पडली. त्यानंतर दररोजच एखादा मृत्यु आणि धक्कादायक रुग्णवाढ असा खेळ सुरु झाला तो अगदी कालपर्यंत कायम आहे. 2 सप्टेंबर रोजी समनापूरमधील 62 वर्षीय इसमाच्या मृत्युसह ग्रामीणभागात 31 तर शहरी भागात सहा रुग्ण, 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुणाचा मृत्यु आणि ग्रामीण भागात 9 रुग्णांसह तालुक्यात 16 रुग्णांची भर, 4 सप्टेंबररोजी ग्रामीणभागात विक्रमी 62 रुग्णांसह 80 रुग्णांची वाढ, 5 सप्टेंबरोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुणासह ग्रामीण क्षेत्रात 51 तर शहरात 15 अशा एकुण 66 रुग्णांची भर, 6 सप्टेंबररोजी ग्रामीणभागात 33 आणि शहरीभागात आठ रुग्णांची भर पडण्यासोबतच धक्कादायकरित्या गिरीराजनगर येथील 62 वर्षीय इसम, पंपींग स्टेशन येथील 73 वर्षीय महिला, चिखलीतील 76 वर्षीय महिला व घुलेवाडीतील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा बळीही गेला. 7 सप्टेंबररोजी पुन्हा एकदा रुग्णसंख्या पन्नासच्या पुढे जात ग्रामीणभागात 46 तर शहरात अवघ्या 6 संक्रमितांची भर पडली. 8 सप्टेंबररोजी ग्रामीणभागात 26 रुग्णांसह एकुण 30 रुग्ण आढळले, 9 सप्टेंबररोजी ग्रामीणभागातील 61 रुग्णांसह एकुण 72 रुग्ण व कालच्या गुरुवारी शहरातील केवळ 12 व ग्रामीणभागातील 72 रुग्णांसह 84 रुग्णांची भर पडली.


सप्टेंबरमधील गेल्या दहा दिवसांचा विचार करता शहरातील तिघांसह ग्रामीणभागातील पाच जणांचा कोविडने बळी घेतला. ऑगस्टमध्ये दररोज सरासरी 31 रुग्णांची भर पडत होती, या महिन्यात मात्र त्यात मोठी वाढ होवून पहिल्या दहा दिवसांतच 521 रुग्ण वाढले. या महिन्यातील सरासरीने ऑगस्टच्या आकडेवारीला मागे सोडण्याचाच चंग बांधल्याने ऑगस्टच्या सरासरीला खुप मागे टाकीत सद्यस्थितीत प्रत्येक दिवशी 52 या प्रमाणे तालुक्यातील रुग्णवाढ होवू लागली आहे. रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहील्यास या महिन्याच्या अखेरपर्यंत तालुका तिसरे सहस्रक ओलांडून खुप पुढे गेलेला असेल असा वैद्यकीय जाणकारांचा कयास आहे. या महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच गेल्या महिन्याच्या तुलनेत ग्रामीणभागातील संक्रमण अधिक मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. या दहा दिवसांत ग्रामीणभागात दररोज 42.4 या दराने तर तुलनेत शहरात 9.7 इतक्या अल्पशा वेगाने रुग्णवाढ होत आहे. नागरिकांनी कोविडच्या संक्रमणाचा वेग आणि त्याची दाहकता यांचा विचार करुन काळजी न घेतल्यास तालुक्याची कोविड स्थिती अत्यंत गंभीर होणार असल्याचे या आकडेवारीतून अगदी सुस्पष्ट होत आहे. याच महिन्यात तालुक्यातील 170 पैकी 108 गावांत पसरलेल्या कोविडचा प्रादुर्भाव वाढून तो आता 75 टक्के ग्रामीणभागात म्हणजे 127 गावांपर्यंत पोहोचला आहे.

गेल्या एप्रिलपासून सुरु झालेल्या कोविडच्या संक्रमणावर एका नजरेत दृष्टीक्षेप टाकल्यास एप्रिलमध्ये ग्रामीणभागातील एकासह आठ रुग्ण, मे महिन्यात पाच जणांच्या मृत्युसह ग्रामीण रुग्णसंख्येत 21 तर शहरी रुग्णसंख्येत 15 रुग्णांची वाढ, जूनमध्ये सहा जणांच्या मृत्युसह ग्रामीणभागातील 23 तर शहरी भागातील 42 जणांना संक्रमण, जुलैमध्ये सात जणांच्या मृत्युसोबतच ग्रामीणभागात 381 तर शहरीभागात 269 रुग्णांची वाढ, ऑगस्टमध्ये सात मृत्युसह ग्रामीणभागात 603 तर शहरीभागात 358 रुग्णांची भर व चालु महिन्यातील अवघ्या दहा दिवसांतच आठ जणांच्या मृत्युसह तालुक्याच्या ग्रामीणभागातील 127 गावांमध्ये प्रादुर्भाव पसरण्यासोबतच ग्रामीण रुग्णसंख्येत 424 तर शहरी रुग्णसंख्येत 97 अशा सरासरी प्रती दिवस 52 रुग्ण या दराने संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 521 रुग्णांची भर पडली आहे. रुग्णवाढीचा हा वेग कायम राहील्यास या महिन्यात रुग्णवाढीचे तिसरे सहस्रकही मागे सुटण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Visits: 134 Today: 1 Total: 1589391

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *