पोलीस निरीक्षक दुधाळ यांची पुन्हा राहुरीला बदली करा! राहुरी तालुक्यातील नागरिकांतून होतेय जोरदार मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी येथे चार महिन्यांपूर्वी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नुकतीच तडकाफडकी नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नव्यानेच आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंह रजपूत यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. तत्पूर्वी दुधाळ यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवत नागरिकांत विश्वास निर्माण केला होता. त्यामुळे पुन्हा त्यांची बदली येथेच करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची राहुरीच्या प्रभारीपदी नियुक्ती केली होती. पदभार स्वीकारल्यानंतर बिघडलेली कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अख्खा तालुका पिंजून काढून अनेक अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर धडक कारवाया केल्या. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यानंतर नंदकुमार दुधाळ यांनीही सर्वसामान्य नागरिकांत विश्वास निर्माण केला. त्यानंतर मात्र अचानक पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली. यामुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण पसरले असून पुन्हा त्यांची बदली राहुरीला करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे रुजू झाल्यापासून राहुरी तालुका हद्दीत गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. एक खमके पोलीस अधिकारी असून तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांची पुन्हा राहुरीत नियुक्ती करावी.
– सुनील हिवाळे (सामाजिक कार्यकर्ते, कोंढवड)

Visits: 142 Today: 1 Total: 1115325

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *