महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात संगमनेरात गुन्हा! प्रेषितांविरोधात वक्तव्याचा आरोप; मध्यरात्री तीनबत्ती चौकात चक्काजाम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेटावरील सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे संस्थापक, प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्याबाबत केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. सिन्नर तालुक्यातील एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत केलेले कथन समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाने स्वातंत्र्यदिनी मध्यरात्री तीनबत्ती चौकात ठिय्या देत तब्बल तीनतास नगर, पुणे व नाशिककडे होणारी वाहतूक रोखली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आल्याने शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर पोलिसांनी आज पहाटे अहमद रझा युनुस शेख याच्या फिर्यादीवरुन महंतांविरोधात धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशासह वीजकीय (इलेक्ट्रॉनिक्स) साधनांचा वापर करुन सार्वजनिक आगळीक केल्याच्या कारणावरुन भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याच कारणावरुन महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात वैजापूर व येवला येथेही गुन्हे दाखल झाले आहेत.

गुरुवारी (ता.15) देशभर 78 व्या स्वातंत्र्यदिनाची धूम होती. याच दरम्यान पंचाळे (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथील नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, सराला बेट (ता.श्रीरामपूर) येथील मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांशी संवाद साधताना महंतांनी मुस्लिम धर्माचे संस्थापक, प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या विवाहाबाबत वक्तव्य केले. तोच धागा पकडून त्यांनी दोन धर्मांमधील तुलनात्मक गोष्टींचाही ऊहापोह करीत धर्माचा आदर्श याविषयी वक्तव्य केल्याने ते वादग्रस्त ठरले.


याबाबत त्यांनी केलेल्या विधानाची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्याचे पहिले पडसाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये उमटले. तेथील आंबेडकर चौकात एकत्रित झालेल्या मुस्लिम धर्मियांनी महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केल्याने वैजापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदोलक गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम राहील्याने अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत शांतता निर्माण केली. मात्र त्यानंतर येवला व मनमाड (जि.नाशिक) येथेही अशाचप्रकारे आंदोलने करुन पोलीस ठाण्यांसमोरच ठिय्या दिला गेला. त्यामुळे पोलिसांनी येवला पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल केला.


गुरुवारी (ता.15) दुपारनंतर महंत रामगिरी महाराजांचा ‘तो’ व्हिडिओ संगमनेरातही मोठ्या प्रमाणात व्हायरल होवू लागला. शहरातील मुस्लिम तरुणांच्या ‘हजरत टिपू सुल्तान एक यौद्धा युवा मंच’ या सोशल माध्यमात तो शेअर झाल्यानंतर त्या समूहातील मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. काही वेळातच हा विषय शहराच्या वेगवेगळ्या भागातही पोहोचल्याने रात्री अकराच्या सुमारास सुमारे दोन ते अडीच हजार मुस्लिम नागरीकांनी तीनबत्ती चौकात गर्दी करीत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी फौजफाट्यासह तेथे धाव घेत जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.


रात्री अकराच्या सुमारास जमावाने घोषणाबाजी करीत जुन्या पुणे-नाशिक महामार्गासह कोल्हार-घोटी राज्यमार्गावरच ठिय्या दिल्याने चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान पोलिसांनी वारंवार आवाहन करुनही जमाव ऐकण्याचा स्थितीत नसल्याचेही चित्र दिसले. यावेळी पोलिसांनी वैजापूर व येवला पोलीस ठाण्यात यापूर्वीच महंतांवर गुन्हा दाखल झाल्याची माहितीही देवून बघितली, मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे दोन्ही महामार्ग जाम होवून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. अखेर पहाटे दोनच्या सुमारास पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची तयारी दाखवत फिर्यादीसह पाच माणसांना पोलीस ठाण्यात पाचारण केले आणि उर्वरीत जमावाला महामार्ग मोकळा करुन घरी जाण्याची सूचना केली. मात्र, महामार्ग मोकळा करु, पण जोवर गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत घरी परतणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.


याबाबत लखमीपूरा येथे राहणार्‍या अहमद रझा युनुस शेख (वय 23, दूध व्यावसायिक) याने आज पहाटे साडेचार वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुरुवारी (ता.15) दुपारी बाराच्या सुमारास ‘हजरत टिपू सुल्तान एक यौद्धा युवा मंच’ हा व्हॉट्सअ‍ॅप समूह बघत असताना महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ बघितल्याचे त्याने नमूद केले आहे. या व्हिडिओतून महंतांनी प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या विवाहाचा दाखला देत सरतेशेवटी मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावतील अशाप्रकारचे वक्तव्य केल्याचा आरोप केला. सदरचे वक्तव्य त्यांनी पंचाळ (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथे केल्याची पृष्टीही त्यात जोडण्यात आली.


त्यावरुन शहर पोलिसांनी सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेतील धार्मिक भावना दुखवण्याच्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारल्याच्या कलम 302 व केलेल्या विधानाला वीजकीय (इलेक्ट्रॉनिक्स) साधनांचा वापर करुन सार्वजनिक आगळीक केल्याच्या कलम 353 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये विखुरलेले कोट्यवधी अनुयायी असलेल्या मठाच्या मठाधिपत्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा नोंद झाल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कोण आहेत रामगिरी महाराज?

वैजापूर तालुक्यातील कापूरवाडीचे भूमिपूत्र थोर संत सद्गुरु गंगागिर महाराज यांचा जन्म सन 1814 साली झाला आणि सन 1902 मध्ये त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांनी वैजापूर (जि.छत्रपती संभाजीनगर) आणि श्रीरामपूर (जि.अहमदनगर) या दोन तालुक्यांच्या सीमांना स्पर्श करणार्‍या गोदाकाठावरील सराला बेटावर मठाची स्थापना केली. या बेटावरील त्यांचे कार्य पाहून प्रभावित झालेल्या वैजापूरच्या रुपचंद संचेती यांनी या बेटावरील त्यांची 65 एकर सुपिक जमीन त्यांना दान केली. वारकरी संप्रदायाच्या समर्पक विचारधारेतून त्यांनी तत्कालीन निजामशाहीच्या जुलमी राजवटीत पिचलेल्यांना एकत्र केले.

शिर्डीचे साईबाबा सद्गुरु गंगागिर महाराजांना गुरुस्थानी मानीत असतं. लोकांना संघटीत करण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी देवळा-रावळातून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा रुजवली. व्यसनमुक्त समाज, अस्पृश्य निर्मूलन यासारख्या गोष्टींवर या सप्ताहाच्या माध्यमातून भर दिला गेला. जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आणि त्यात दररोज सात दिवस अगदी नियोजनबद्ध पद्धतीने होणारे अन्नदान अशी ओळख असलेल्या गंगागिर महाराजांच्या सप्ताहाची दखल ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्येही घेण्यात आलेली आहे. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आजही अखंडपणे सुरु आहे.


सन 1902 साली त्यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांची ही परंपरा पुढे त्यांचे प्रियशिष्य दत्तगिरी महाराज यांनी सुरु ठेवली. तीच परंपरा त्यानंतरच्या श्रीनाथगिरी महाराज, सोमेश्‍वरगिरी महाराज, श्रीनारायणगिरी महाराज यांनी कायम ठेवली आणि 2009 पासून रामगिरी महाराज या पालखीचे भोई झाले आहेत. त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत सरला बेटाचा केवळ धार्मिक क्षेत्र म्हणून विकास न करता पर्यटन क्षेत्र म्हणूनही या परिसराला साज चढवला आहे. येथून जवळच असलेल्या शनिदेव गाव या शनी महाराजांच्या जागृत ठिकाणाचाही त्यांनी कायापालट केला आहे. त्यामुळे सरालाबेट आणि शनिदेव गाव या ठिकाणी येणार्‍या भाविकांसह पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. रामकृष्ण हरीच्या मंत्रांची उपासणा करणार्‍या परंपरेतील महंत रामगिरी महाराज यांनी इतिहासातील दाखला देत त्याला जोडलेल्या आपल्या मतावरुन उफाळलेल्या या वादावर त्यांच्या अनुयायांमधूनही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Visits: 127 Today: 3 Total: 112859

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *