संगमनेरची वाटचाल ‘पुन्हा’ लॉकडाऊनच्या दिशेने… नागरिकांकडून नियमांची पायमल्ली तर प्रशासनाची उदासीनता

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दीड वर्षांपासून कोविड विषाणूंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेकांचा विषाणूंनी बळी घेतला. तर अनेकांचा रोजगार हिरावल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होवून संपूर्ण नियोजनच कोलमडून गेले. यामुळे शासन व आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. लस उपलब्ध होवूनही राजकीय हस्तक्षेप आणि उदासीनतेमुळे लसीकरणाचा अक्षरशः बट्ट्याबोळ उडाला आहे. असे चित्र संगमनेर तालुक्यातही दिसत आहे. त्यातच रुग्णसंख्या काही थांबवण्याचे घेत नसल्याने संगमनेरची ‘पुन्हा’ लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल होण्याची भीती जाणकार व्यक्त करु लागले आहेत.

कोविड विषाणूंनी संगमनेर शहरात चंचूप्रवेश केल्यानंतर सातत्याने विक्रम गाठला. शहराला बाधा पोहोचविण्याबरोबर ग्रामीण भागालाही विळखा घातला. याचा प्रचंड ताण शासकीय यंत्रणेवर आला आहे. यामध्ये अनेक कोविड योद्ध्यांचाही बळी गेला. तर असंख्य हात मदतीसाठी सरसावत आहे. कधी नागरिकांचा तर कधी प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर येत असल्याने कोविडला अधिकच पोषक वातावरण मिळत आहे. केंद्र व राज्य सरकार वारंवार लसीकरणाबद्दल सांगत आहे. मात्र, चित्र याउलट आहे. पहिला डोस झालेले दुसर्‍या डोसपासून वंचित आहेत. तर काहींना पहिला डोस मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे.

सध्या राज्य सरकारने निर्बंध शिथील केल्याने बाजारपेठा फुल्ल दिसत आहे. यातून कोविडचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. इतका हैदोस घालूनही अनेकजण नियमांना पायदळी तुडवत असल्याने हा निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर बेतत आहे. स्वातंत्र्य दिनापासून दररोज 147, 103, 122, 139 आणि 227 असे एकूण पाच दिवसांत तब्बल 738 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच लसीकरणाचा पुरता फज्जा उडाला आहे. संगमनेर ग्रामीण रुग्णालयाने तर 20 ऑगस्टला लससाठा उपलब्ध नसल्याने लसीकरण सत्र होणार नसल्याचेच सांगितले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर संगमनेरची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने होवून हॉटस्पॉट होण्याची भीती देखील जाणकारांनी व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांनी तंतोतंत नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116744

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *