भेदभाव करणाऱ्यांना थारा देऊ नका : सुरज चव्हाण 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
रामोशी समाज हा कायम प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिला. आपल्यामध्ये काही लोक भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना थारा देऊ नका. संगमनेरचे नाव बाळासाहेब थोरात यांनी देशात पोहोचवले असून त्यांच्यामुळे संगमनेरचा विकास झाला असल्याचे प्रतिपादन बिग बॉस फेम अभिनेता सुरज चव्हाण याने केले. 
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित रॅली मध्ये तो बोलत होता. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे, डॉ.जयश्री थोरात, तानाजी शिरतार, रमेश जेडगुले, महेश गोफने,मनोज चव्हाण, रोशन चव्हाण, देवराम गुळवे आदींसह  युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुरज चव्हाण म्हणाला, माझ्यासारख्या गरीब मुलाला बिग बॉस मध्ये जाण्याची संधी मिळाली. सुंदर का नसेना, परंतु कलेच्या जीवावर आज राज्यांमध्ये मला मोठा मान सन्मान आहे. लातूर आणि संगमनेरचे प्रेम मोठे आहे. रितेश देशमुख यांनी मला संधी दिली आणि त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे मला कळाले.
संगमनेर तालुका हा बारामती सारखा विकसित आहे हे ऐकून होतो मात्र संगमनेर मध्ये आल्यानंतर येथील विकास हा नक्कीच महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. सहकाराबरोबर येथे झालेले बसस्थानक हे विमानतळासारखे आहे.  बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल  युवकांना मोठे आकर्षण आहे. मात्र काही युवक भरकटले असून यापुढे जातिभेद निर्माण करणाऱ्या शक्तींना ताकद देऊ नका. रामोशी समाज हा प्रामाणिक आणि निष्ठावंत आहे. उमाजी नाईकांचा वारसा आपल्या सर्वांना आहे. संघर्ष आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्र धर्म आणि गोरगरिबांचे स्वातंत्र्य वाढवायचे आहे. त्यामुळे एकजुटीने काम करा संगमनेरचा नावलौकिक वाढवा असे तो म्हणाला. यावेळी सुरज चव्हाण याची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संगमनेर बसस्थानकापासून सटाणा येथील प्रसिद्ध बँड दणदणाटात  मिरवणूक काढण्यात आली.
Visits: 174 Today: 1 Total: 1793865

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *