पावसाने उघडीप दिल्याने पठारभागातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या! शेतकर्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या; तर मशागतीची सर्व कामे पूर्ण

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात पावसाने उघडीप दिल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून कोविडचे संकट सुरू असल्याने शेती व्यवसाय बुडत आहे. आता निसर्गही पुन्हा धक्का देत असल्याने शेतकर्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या असल्याचे चित्र दिसत आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील विस्तीर्ण डोंगरांमध्ये पठार भाग वसला आहे. परंतु, निसर्गाचा अधिवास असूनही वर्षानूवर्षांपासून दुष्काळ त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. वरुणराजाची कृपादृष्टी झालीच तरच येथील शेती फुलते. त्यावरच शेतकरी शेंद्री कांदा, बाजरी, वटाणा, सोयाबीन आदी खरीपाची पिके घेतात. मात्र, मुबलक पाऊस झाली नाही तर संपूर्ण खरीप हंगाम वाया जातो. शेती व्यवसायावरच उदरनिर्वाह अवलंबून असल्याने हंगाम वाया गेला तर शेतकर्यांपुढे आर्थिक परिस्थितीचा यक्षप्रश्न निर्माण होतो. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. एकामागून एक संकट येत असल्याने करावे तरी काय असा प्रश्न सतावत आहे.

मान्सून पूर्व मशागतीची कामे उरकली असून फक्त पेरण्या बाकी आहेत. मात्र रोज सकाळी पावसाचे वातावरण निर्माण होते आणि दुपारी पुन्हा ऊन पडते. असा ऊन-सावल्यांचा निसर्गाचा खेळ चालू आहे. यामुळे हा हंगामही वाया जातो की काय या चिंतेने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जर पेरण्या करुन पाऊस झाला नाही तर पुन्हा दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावेल. आधीच कोरोनाने आर्थिक गणित कोलमडलेले आहे. त्यातच दुबार पेरणीचे संकट आले तर पैसे आणायचे कोठून असे नानाविध प्रश्न शेतकर्यांसमोर उभे ठाकले आहेत. म्हणून शेतकरी आता चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहे. तत्पूर्वी रोहिणी नक्षत्र संपून गेले तरी पाऊस काही पडण्याचे नाव घेईना. सुरुवातीला रोहिणी नक्षत्रात काहीसा पाऊस पडला. परंतु, त्यानंतर पावसाने अद्यापही उघडीप दिल्याने शेतकर्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या असल्याचे चित्र पठारभागात दिसत आहे.

खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून पठारभागातील शेतकर्यांनी कृषी केंद्रांमधून बी-बियाणे आणि खते खरेदी करून ठेवली आहे. शिवाय मशागतीची कामेही पूर्ण झाली आहेत. फक्त पेरणी योग्य पाऊस झाला की लगेचच पेरणी सुरू करायची अशा तयारीत शेतकरी आहेत. मात्र, प्रवरा व मुळा खोर्यात पावसाने हूल दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
