रोटरीतर्फे संगमनेरातील उसतोडणी कामगारांची दिवाळी गोड किराणा सामान व साड्या भेट; लहान मुलांना खाऊचे वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सातत्याने वंचितांना मदतीचा हात देणार्या येथील रोटरी क्लबच्यावतीने दिवाळीत घरापासून दूर असलेल्या व इच्छा असूनही दिवाळी साजरी करु न शकणार्या वंचित ऊसतोडणी कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी सामाजिक जाणीवेतून प्रयत्न करण्यात आले. येथील रोटरी सदस्य व कापड व्यावसायिक सोनू राजपाल, ओंकार सोमाणी यांच्यासह किराणा व्यावसायिक रमेश दिवटे यांच्यासह रोटरी क्लबच्या सदस्यांच्या दातृत्वातून ऊस तोडणीसाठी संगमनेरात आलेल्या 150 महिलांना भाऊबीज म्हणून नुकतेच किराणा सामान व साड्या भेट देण्यात आल्या.

आपल्या लेकराबाळांसह घरापासून दूरवर आलेल्या येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी विविध उपक्रमांसाठी ओळखल्या जाणार्या येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून ही भेट देण्यात आली. येथील व्यावसायिकांच्या मोठ्या मदतीतून व रोटरीच्या अन्य सदस्यांच्या हातभारातून या वंचितांची दिवाळी गोड होण्यास मदत झाली. 150 भगिनींना सुमारे एक हजारांच्या किराणा मालासह साड्या आणि लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहर्यावरील आनंद अवर्णनीय होता.

रोटरी क्लब दरवर्षी अशाप्रकारचे उपक्रम राबवत सामाजिक दायित्व निभावत आले आहे. कारखान्याच्या पेपर मिल परिसरात सध्या ऊसतोडणी कामगारांची पाले पडलेली आहेत. तेथे हा भाऊबीज प्रकल्प संपन्न झाला. याठिकाणी जाणीवपूर्वक अंधारात अडगळीला उभारलेल्या अंधारात पालापालात पोहोचत. या श्रमजीवींच्या जीवनात दारिद्र्याच्या तिमीराला छेद देणारी आपलेपणाची पणती तेवत ठेवण्याचा रोटरीचा हा उपक्रम प्रशंसनीय ठरतो. यावेळी रोटरीचे अध्यक्ष योगेश गाडे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, सेक्रेटरी ऋषीकेश मोंढे, खजिनदार मयूर मेहता, डॉ. प्रमोद राजूस्कर, डॉ. किशोर पोखरकर, दीपक मणियार, सुनील घुले, पवनकुमार वर्मा, रवी पवार, संजय राठी, अजित काकडे, आनंद हासे, संजय कर्पे, विश्वनाथ मालाणी, सुदीप वाकळे, अण्णासाहेब शेलकर, अजित मंडलिक आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.

आपल्या घरादारापासून दूर, ऐन सणासुदीच्या काळात पोटाची खळगी भरण्याबरोबर संसारगाडा रुळावर आणण्यासाठी काबाड कष्ट करणार्या भगिनींच्या चेहर्यावर क्षण दोन क्षण आनंद झळकावा. मायेच्या पांघरुणाची त्यांना ऊब मिळावी. त्यांच्या भुकेल्या लेकरांच्या मुखी गोड फराळाची चव काही काळ का होईना रेंगाळावी. यासाठी रोटरी क्लब संगमनेर दरवर्षी पाला-पालावर जाऊन भाऊबीज हा उपक्रम साजरा करत असते.
