राहाता तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा!
राहाता तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा!
वाकडी ग्रामस्थ, शिवसेना व आरपीआयचे तहसीलदारांना निवेदन
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्वरीत शेतकर्यांना मदत जाहीर करावी. तसेच पुढील हंगामातील पिकांचा विमा शासनाच्यावतीने मोफत करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन वाकडी ग्रामस्थ, शिवसेना व आरपीआयच्यावतीने राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांना नुकतेच देण्यात आले.

याविषयी बोलताना शिवसेनेचे महेश जाधव व आरपीआयचे सुभाष कापसे म्हणाले, ऐन कोरोना संकटात दुबार पेरणी, दुधाला कमी भाव व आता अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अक्षरशः आर्थिक कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, बाजरी यासारख्या पिकांत पाणी साचल्याने ती पिके सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ऊस, फळबाग यांचेही अतोनात नुकसान झाल्याने शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून त्वरीत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करावी. तरच शेतकरी पुढील हंगाम घेऊ शकेल. अन्यथा पैशांअभावी शेती ओसाड पडेल अशी भीतीही त्यांनी शेवटी व्यक्त केली. यावेळी राजेंद्र लहारे, महेश लहारे, गोरक्षनाथ लबडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

