पावसाळ्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून – गाळून प्यावे ः तांबे संगमनेर नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनची नगराध्यक्षा दुर्गा तांबेंनी केली पाहणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या विशेष प्रयत्नांतून निळवंडे धरण ते संगमनेर शहराला थेट पाणी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्यात आली आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर करताना ते उकळून व गाळून घ्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.
या अनुषंगाने नगराध्यक्षा तांबे यांनी पंपिंग स्टेशन येथे समक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पक्षप्रतोद विश्वास मुर्तडक, नगरसेवक नितीन अभंग, बाळासाहेब पवार, किशोर पवार, गजेंद्र अभंग, धनंजय डाके आदी उपस्थित होते. पाणी पुरवठा विभाग प्रमुख अभियंता राजश्री मोरे, माधव पावबाके व पंपिंग स्टेशन येथे कार्यरत असणार्या कर्मचार्यांशी चर्चा केली.
यावेळी शहरवासियांना आवाहन करताना नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, पावसाळ्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणामध्ये पाण्याची नवीन आवक होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईनद्वारे काही प्रमाणात गढूळ पाणी येऊ शकते. नगरपरिषदेच्यावतीने या पाण्यावर आवश्यक प्रक्रिया करण्यात येत असते व त्यानंतरच शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. तरीही पावसाळ्यामुळे काही ठिकाणी व काही प्रमाणात गढूळ पाण्याच्या शक्यतेतून नगरपरिषदेने पाणी पुरवठ्यासाठी सुविधा करून दिलेल्या नळाद्वारे येणारे पाणी नागरिकांनी उकळून, गाळून व थंड करूनच त्याचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.