स्वच्छतेतून अस्मिता निर्माण करणारी ‘स्मिता’! बुळे हॉस्पिटलमध्ये सेवा करुन करताहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह


नायक वृत्तसेवा, अकोले
काम कुठलेही असो ते मनापासून करा. आपण करत असलेल्या कामावर निष्ठा आणि श्रद्धा ठेवून काम केल्यास मनापासून आनंद घेता येतो. असे म्हटले जाते की जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मी वास करते. स्वच्छतेतून लोकसेवा करणारी स्मिता मोहन नक्कीच सर्वांसमोर आदर्श ठरत आहे.

अकोले शहरातील नामवंत बुळे हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्‍या स्मिता राजू मोहन या गेली दहा वर्षे अविरतपणे सेवा देत आहेत. भल्या पहाटे त्यांचे स्वच्छतेचे काम सुरू होते. स्वच्छतेत समृद्धी आहे हे शब्द तंतोतंत त्या खरे ठरवत आहेत. रोज सकाळी बरोबर चार वाजता हॉस्पिटलची स्वच्छता करण्यासाठी आदबीने हजर होत असे. अगदी हा वेळ कधीही न चुकू देता त्या अतिशय मनापासून स्वच्छता करतात हे मात्र विशेष. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक हॉस्पिटलची स्वच्छता करताना त्या दिसतात. त्यांच्या या सेवेचं रुग्णांना आणि नातेवाईकांना खूपचं कुतूहल वाटतं. आपण करत असलेले काम मनोभावे व आनंदाने केल्यास त्या कामाला वेगळी झळाळी मिळते. अगदी असेच मनोभावे हॉस्पिटल स्वच्छतेचे काम त्यांच्या हातून दररोज होत आहे. हॉस्पिटलमधील प्रत्येक वॉर्ड व संपूर्ण परिसर एकहाती स्वच्छ ठेवण्याचा त्यांचा उत्साह जगावेगळा आहे.

त्यांच्या कुटुंबात दोन मुली व एक मुलगा आहे. मुलींचे लग्न केले आहे. या सर्वांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. मुलगा चालक म्हणून खासगी गाडीवर काम करतो. घरची परिस्थिती अतिशय बेताची व नाजूक असल्याने त्यांचे पोट हातावरचेच आहे. परंतु त्याचे कधीही त्यांनी भांडवल केले नाही. आपण करत असलेले काम निष्ठापूर्वक व मनापासून केल्यास त्याचा आनंद तर मिळतोच. परंतु मानसिक समाधान सुद्धा मिळते असे त्यांचे ठाम मत आहे. स्वच्छतेतून आजारी रुग्णांना मनोभावे सेवा देणार्‍या या माऊलीला शतशः नमन.

Visits: 41 Today: 1 Total: 438541

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *