संगमनेरच्या ऐतिहासिक रथोत्सवात यंदा सेलेब्रिटिंचा सहभाग! केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्यासह भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांची उपस्थिती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिला शक्तिचे प्रतिक असलेला संगमनेरचा ऐतिहासिक रथोत्सव दोन वर्षांच्या कोविड निर्बंधांनंतर यावर्षी सार्वजनिक पातळीवर साजरा होत आहे. त्या अनुषंगाने श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावर्षीच्या रथोत्सवात पहिल्यांदाच देशात कर्तृत्त्व सिद्ध करणार्या दोघींना विशेष निमंत्रण देण्यात आले असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व भाजपच्या राज्य प्रवक्त्या चित्रा वाघ संगमनेरकर महिलांसह या ऐतिहासिक रथाची चाके ओढणार आहेत. यापूर्वी या उत्सवाबाबत अनिश्चितता निर्माण करणार्या काही घडामोडी समोर आल्या होत्या, मात्र विश्वस्त मंडळाने लागलीच आपली भूमिका स्पष्ट केल्याने गेल्या नऊ दशकांपासून संगमनेरकर महिलांच्या पराक्रमाचे गुणगान गाणारा हा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

संगमनेर परिसराला 2200 वर्षांचा मोठा इतिहास लाभला आहे. अगदी प्रागैतिहासापासून विविध घटना आणि घडामोडींचे केंद्र
असलेल्या संगमनेरला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचाही मोठा वारसा आहे. यात संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त निघणारा रथोत्सव अग्रणी आहे. ब्रिटीश राजवटीत सन 1927 पासूनच या उत्सवात अडथळे निर्माण करण्यास पोलिसांकडून सुरुवात झाली होती. 23 एप्रिल 1929 रोजी हनुमान जयंतीच्या दिनी तर पाचशे सशस्त्र ब्रिटीश पोलिसांनी चंद्रशेखर चौकातील या रथालाच गराडा घालून हा रथ जागेवरुन हलविण्यासच मनाई केली. त्यावेळी या फौजफाट्यात महिला पोलिसांची वाणवा असल्याने झुंबराबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे यांच्यासह शेकडों संगमनेरी महिलांनी पुढाकार घेत रथात मारुतीरायाची चलप्रतिमा ठेवली आणि पोलिसांना काही समजण्याच्या आंतच बजरंग बली की जयचा घोष करीत या महिलांनी रथाची चाके ओढली ती थेट रंगारगल्लीपर्यंत.

त्यानंतर रंगारगल्लीतून हा रथ पुढे नेण्यासही मोठा अडथळा निमार्र्ण केला गेला. मात्र संगमनेरकरांनी एकजूट दाखवित दोन महिने हा रथ रंगारगल्लीतच उभा असतांनाही आपल्या उत्साहात कमतरता येवू दिली नाही. त्यामुळे ब्रिटीशांना संपूर्ण माघार
घेण्यासह या उत्सवात पुन्हा कधीही अडथळा आणला जाणार नाही, नागरीकांचा उत्साह वाढावा यासाठी दरवर्षी प्रशासनाच्यावतीने पोलिसांकडून वाजतगाजत भगवा ध्वज नेवून या रथावर चढविला जाईल व त्यानंतरच या रथोत्सवाला सुरुवात होईल अशा आशयाचा लेखी करार करुन द्यावा लागला होता. तेव्हापासून दरवर्षी पोलिसांकडून वाजतगाजत मिरवणूकीने मानाचा ध्वज आणला जातो, त्यानंतर प्रभारी पोलीस अधिकार्यांच्या हस्ते तो या ऐतिहासिक रथावर चढविला जातो. त्यानंतर जमलेल्या शेकडों महिला या रथाचे दोर आपल्या हाती घेतात आणि बजरंग बली की जयचा घोष करीत रथाची चाके ओढतात. मागील 93 वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत कोविड संक्रमणाचाही खंड पडला नाही. या परंपरेला बळ देण्यासाठी यावर्षी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीने देशात कर्तृत्त्व गाजवणार्या महिलांना विशेष निमंत्रण दिले आहे. त्यामुळे यंदाच्या या रथोत्सवात संगमनेरकर महिलांसोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व भारतीय जनमा पक्षाच्या राज्य प्रवक्ता चित्रा वाघ या दोन कर्तृत्त्ववान महिला सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदाचा रथोत्सव यादगार ठरणार असून उत्सव समितीने या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जय्यत तयारीही केली आहे.

गेल्या नऊ दशकांपासून संगमनेरकर महिलांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या श्री हनुमान जयंतीचा विजयरथ स्थानिक महिलाच ओढीत असतात. यापूर्वी कधीही अन्य ठिकाणच्या सन्माननीय महिलांना या उत्सवासाठी पाचारण करण्यात आलेले नव्हते. यंदा मात्र श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीने हा उत्सव अधिक जोमाने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला असून महिला पराक्रमाची ही गाथा देशभर पोहोचावी यासाठी देशात कर्तृत्त्व गाजवणार्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना विशेष निमंत्रित केले आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाचा हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होईल अशी समितीला अपेक्षा आहे.

