जीव देवूनही मयत विवाहितेला न्याय मिळेना! घारगाव पोलिसांची चालढकल; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या..

नायक वृत्तसेवा, घारगाव
देशातील शिक्षणाचा टक्का वाढूनही हुंड्यासाठी विवाहितांना मारहाण आणि त्यांचे शारीरिक व मानसिक छळाचे प्रकार कमी होईनात. त्यातच अशा काही घटनांमध्ये पोलिसांचा असंवेदनशिलपणाही समोर येत असल्याने विवाहितांचे जीव स्वस्त झाल्यासारखे चित्र वेळोवेळी समोर येत असते. असाच काहीसा प्रकार तालुक्याच्या पठारभागातील जांबुत बु. येथून समोर आला असून हुंड्यासाठी सततच्या छळाला कंटाळलेल्या विवाहितेने विहिरीत उडी घेत जीव देवूनही तिला तसे करण्यासाठी भाग पाडणार्या सगळ्या आरोपींना गजाआड करण्यात घारगाव पोलीस अपयशी ठरले आहेत. या घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही पोलीस काहीच हालचाल करीत नसल्याने अखेर मयत पूजा मोहीते या विवाहितेच्या संतप्त नातेवाईकांनी आज थेट घारगाव पोलीस ठाणे गाठीत दुपारपासून तेथे ठिय्या दिला आहे. या प्रकाराने नेहमीच वादग्रस्त ठरलेले घारगाव पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 27 नोव्हेंबररोजी अकोले येथील पूजा कर्णिक या तरुणीचा विवाह संगमनेर तालुक्यातील पठारावरील जांबुत बु. येथील सागर रघुनाथ मोहिते याच्यासोबत अगदी थाटामाटात झाला होता. मुलीच्या वडिलांनी आपल्या ऐपतीपेक्षा कितीतरी अधिक चांगला विवाह करुन देत आपल्या लाडक्या लेकीला सासरी पाठवले. सुखी संसाराची स्वप्नं सोबत घेवून सासरी आलेल्या पूजाचे अंगावरील हळद उतरेपर्यंतचे नऊ दिवस अगदी आनंदाने गेले. त्यानंतर मात्र तिच्या नवर्यासह सासरच्या मंडळींच्या मनातील लालसा जाग्या होवू लागल्या आणि त्यातून पूजाकडे पैशांची मागणी होवू लागली. सुरुवातीला तिने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. मात्र सासरची मंडळी मात्र आपल्या मागण्यांपासून परावृत्त होण्याऐवजी दररोज त्यांच्या मागण्या वाढत राहील्या.

दररोज होणारा छळ आणि मारहाण यामुळे अवघ्या 21 वर्षांच्या पूजाचे सुखी संसाराचे स्वप्नं कधीच धुळीला मिळाले होते. मात्र आपल्या आई-वडिलांचे संस्कार तिला कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्यापासून वारंवार रोखीत होते. मात्र तिच्या या चांगुलपणाचा तिच्या सासरी कोणताही प्रभाव पडला नाही. सुरुवातीला माहेरुन तीन तोळे सोने घेवून ये अशी मागणी सुरु झाली, त्यानंतर एक लाख रुपये घेवून ये, मग पोळ्याच्या सणाला भरणा करण्यासाठी 80 हजार घेवून ये अशा एकएक मागण्या समोर येवू लागल्या आणि त्यासाठी तिचा मारहाण, शिवीगाळ, मानसिक व शारीरिक छळ केला जावू लागला. अनेकदा या तरुण विवाहितेला उपाशीपोटीही यातना दिल्या गेल्या. यासर्व गोष्टींना ती पूर्णतः वैतागली होती.

मात्र माहेरी जावे तर आई-वडिलांना आपला घोर लागेल हा एकच विचार तिला वारंवार रोखत होता. अखेर त्यावर अंतिम निर्णय
घेत तिने 26 जुलै रोजी विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्राच संपविली. आपल्या लाडक्या लेकीचा अवघ्या सहा-आठ महिन्यातच झालेला दुर्दैवी अंत पाहून तिच्या माहेरच्या मंडळींना जबर धक्का बसला. अंत्यविधीचे सोपस्कार झाल्यानंतर दुसर्या दिवशी मयतेच्या वडिलांनी घारगाव पोलिसांत आपल्या मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याची कारणे सांगत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मयतेचा पती सागर, सासरा रघुनाथ, सासू सुवर्णा, नणंद पूजा मोहीते (सर्व रा.सोनेमळा, जांबुत बु.) व बबन दौलत पवार (रा.अकोले) या पाच जणांविरोधात भा.द.वी.कलम 306, 304 (ब), 498 (अ), 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यातील पुरुष असलेल्या तिघांना अटक केली.

मात्र आपल्या मुलीचा छळ करण्यात तिची सासू सुवर्णा व नणंद पूजा यांचा मोठा वाटा असल्याचा आरोप करीत मयतेच्या नातेवाईकांनी जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपल्या मुलीला न्याय मिळणार नाही असे वारंवार सांगूनही घारगाव पोलीस त्यांच्या भावनांचा अनादर करीत होते. अखेर त्यावर उपाय म्हणून संतप्त झालेल्या तिच्या पन्नासहून अधिक नातेवाईकांनी आज दुपारी तीनच्या सुमारास अकोल्याहून थेट घारगाव गाठीत ठिय्या दिला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. सध्या घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील त्यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असून जोपर्यंत उर्वरीत आरोपींना गजाआड करीत नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याची भूमिका मयत पूजाच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

