मृत व्यक्तींच्या देहाची उत्खनन करुन विटंबना गोपाळपूर येथील श्रीधर शेरे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील गोपाळपूर येथील मागासवर्गीय दफनभूमीत मृत व्यक्तींच्या देहाची विटंबना व उत्खनन केल्याच्या निषेधार्थ वारंवार पत्र व्यवहार करून देखील कारवाई झाली नाही. यामुळे श्रीधर रायभान शेरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता कोतवाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

याबाबत शेरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गोपाळपूर येथील दफनभूमीत श्रीधर शेरे यांचे वडील रायभान शेरे यांचे दफन करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांची आठवण म्हणून छोटे थडगे बांधलेले होते. सदर दफनभूमीमध्ये सरपंच पद्मा विलास ढोकणे, उपसरपंच सोपान राजाराम घुले व ग्रामपंचायतीचा ठेकेदार सरपंच यांचा पुतण्या किरण शेषराव ढोकणे यांनी संगनमताने या दफनभूमीमध्ये जेसीबी मशिनच्या सहाय्याने उत्खनन केले.

या उत्खननावेळी त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या पूर्वजांच्या हाडांचे सांगाडे बाहेर काढून विटंबना केली. यात रायभान शेरे यांचे थडगे वरील इसमांनी संगनमताने उकरून काढले. सदर बेकायदेशीर उत्खननाबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई शासनाकडून झालेली नाही. ही घटना अत्यंत निंदनीय व गंभीर स्वरूपाची असताना देखील त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. उलट मागासवर्गीयांवर झालेला अन्याय दडपून टाकण्यासाठी ग्रामसेवकाने अधिकार कक्षेच्या बाहेर जात पदाधिकार्‍यांना वाचवण्यासाठी खोट्या स्वरूपाची तक्रार दाखल करून शासनाची व मागासवर्गीय समाजाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी होऊन संबंधित सर्व व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी श्रीधर शेरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *