स्वराज्याकरिता क्रांती चळवळ सुरु ठेवावी लागेल ः गांधी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी स्वराज्य अद्याप मिळू शकले नाही. त्याकरीता क्रांती चळवळ सुरू ठेवावी लागेल, असे प्रतिपादन थोर विचारवंत तुषार गांधी यांनी केले.

जयहिंद लोकचळवळीच्यावतीने आयोजित क्रांतीदिन ते स्वातंत्र्य दिन व्याख्यानमालेत सरदार वल्लभभाई पटेल या विषयावर ते ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पद्मश्री पोपट पवार यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. भारतात सध्या ज्या पद्धतीने द्वेष भेदाचे वातावरण निर्माण केले जात आहे. धर्मद्वेषाचे राजकारण करत आपण स्वराज्य निर्माण करणे अवघड आहे. समाजातील सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे या भेदाच्या भिंती उंचावू पाहणार्यांसाठी संधी मिळते आहे. भारताला राष्ट्र म्हणून निर्माण करण्याच्या कामात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. वर्तमानात नेतृत्वाच्या नावावरती सौदेबाजी केली जात आहे. भारतीय स्वांतत्र्यात ज्यांनी योगदान दिले आहे त्या राष्ट्रपुरूषांना जाणून घेण्यासाठी चरित्र जाणून घेण्याची गरज आहे. सरदारजी हे धर्मनिरपेक्ष, सक्षम व द्रष्टे नेतृत्व होते. सध्या भारतीय इतिहास भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही संघटना त्यासाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप विचारवंत तुषार गांधी यांनी केला. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार संकेत मुनोत यांनी केले.
