तीन महिन्यानंतर जिल्ह्याची रुग्णसंख्या पाचशेच्या घरात! संगमनेर तालुक्यालाही मिळतोय सलग दिलासा; आज शहरात अवघे पाच बाधित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट जवळजवळ ओसरली असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या साखळीत जिल्ह्याला आज सर्वात मोठा दिलासा मिळाला असून तब्बल 90 दिवसांनंतर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पाचशेपेक्षा खाली आली आहे. आज जिल्ह्यातील अवघ्या 483 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीलाही मोठा ब्रेक लागला असून आज सलग दुसर्या दिवशी एकूण रुग्णसंख्या 40 पेक्षा कमी आहे. आजच्या एकूण अहवालात शहरातील अवघ्या पाच जणांसह एकूण 36 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 447 झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या 290 आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी वेगही आता 98 टक्क्यांच्या पार पोहोचला आहे. जिल्ह्यातील कोविडचे दुसरे संक्रमण आटोक्यात आले असले तरीही संभाव्य तिसर्या लाटेचा धोका कायम असल्याने नियमांबाबतची सक्ति आजही कायम आहे.

एप्रिल व मे महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या 22 मेपासून जिल्ह्याच्या एकूण रुग्णवाढीला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली आणि चालू महिन्यातील दुसर्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील कोविडचे दुसरे संक्रमण आटोक्यात आले. मात्र त्याचवेळी संगमनेर तालुक्यातील रुग्णगती मात्र जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत अधिकच असल्याने तालुक्यात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जूनच्या दुसर्या आठवड्यात अपवाद वगळता तालुक्याच्या रुग्णगतीलाही उतार लागल्याने आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्यातही समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. जूनच्या पहिल्या सात दिवसांत तालुक्याचा सरासरी रुग्णदर दररोज 88 रुग्ण असा होता, नंतरच्या सात दिवसांत मात्र त्यात मोठी घसरण झाली असून आजच्या स्थितीत तालुक्यातून सरासरी 51 रुग्ण दररोज या गतीने बाधित समोर येत आहेत.

आज (ता.14) शासकीय प्रयोगशाळेचे 13, खासगी प्रयोगशाळेचे 14 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 38 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पोनोडी येथील दोघांनी आरटीपीसीआर आणि अँटीजेन अशा दोन्ही चाचण्या केल्याने त्यांची नावे दोनवेळा आली आहेत, त्यामुळे आज तालुक्यात अवघे 36 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील केवळ पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पाचही जणांचे पत्ते केवळ ‘संगमनेर’ इतक्यावरच नोंदविले गेले असून त्यात 65 वर्षीय दोघा ज्येष्ठांसह 58 वर्षीय दोन व 26 वर्षीय महिलेचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीणभागातील निमगाव बु. येथील 38 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 48 वर्षीय इसमासह 29 वर्षीय तरुण,

पेमगिरीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वडगाव लांडगा येथील 37 वर्षीय तरुण, समनापूर येथील 59 वर्षीय इसम, दरेवाडीतील 62 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 55 वर्षीय इसम, गुंजाळवाडीतील 17 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 40 वर्षीय तरुण, नांदूर खंदरमाळ येथील 36 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला, राजापूर येथील 65 वर्षीय महिला, पानोडीतील 45 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुणी व 27 आणि 21 वर्षीय तरुण, वडझरीतील 40 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील एक वर्षीय बालक, निमगाव जाळीतील 27 वर्षीय महिलेसह 13 वर्षीय मुलगी, चंदनापूरी येथील 53 वर्षीय महिला,

निमज येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शेडगाव येथील सात वर्षीय बालिका, आश्वी बु. येथील 63 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, उंबरी बाळापूर येथील 46 वर्षीय इसम, प्रतापपूर 41 वर्षीय तरुणासह 33 वर्षीय महिला व निमगाव टेंभी येथील 37 वर्षीय तरुण अशा ग्रामीण भागातील 31 जणांसह तालुक्यातील एकूण 36 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या स्थितीत तालुक्यातील 290 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्णसंख्या 22 हजार 447 झाली आहे. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दरही समाधानकारक अवस्थेत पोहोचला असून आत्तापर्यंत 22 हजार 56 जणांवर यशस्वी उपचा झाले आहेत. तालुक्याचा रुग्ण बरा होण्याचा वेग आता 98.26 टक्क्यावर पोहोचला आहे.

आजच्या अहवालातून जिल्ह्यालाही मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 90 दिवसांनंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या पाचशेच्या आंत आली आहे. यापूर्वी 18 मार्चरोजी जिल्ह्यात 454 रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र संक्रमणाने गती घेतल्याने जिल्ह्याची स्थिती भयंकर अवस्थेत पोहोचली होती. विशेष म्हणजे या संपूर्ण कालावधीत दररोज पहिल्या क्रमांकाची रुग्णवाढ होणार्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातील संक्रमण आजच्या स्थितीत पूर्णतः आटोक्यात आले असून जिल्ह्यातील सर्वात कमी रुग्ण समोर येणार्या तालुक्यात महापालिका क्षेत्र अव्वलस्थानी पोहोचले आहे. गेल्या 14 दिवसांत जिल्ह्यात 776 रुग्ण दररोज या सरासरीने 18 हजार 70 रुग्णांची भर पडली. त्यात सर्वाधीक 1 हजार 37 रुग्ण श्रीगोंदा तालुक्यातून समोर आले आहेत, तर सर्वात कमी 432 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रात आढळले आहेत.

आज शासकीय प्रयोगशाळेच्या 18, खासगी प्रयोगशाळेच्या 259 व रॅपीड अँटीजेनच्या 206 निष्कर्षातून जिल्ह्यातील 483 जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले. त्यात राहुरी 59, शेवगाव 46, श्रीरामपूर, कर्जत व पाथर्डी प्रत्येकी 39, संगमनेर व नेवासा प्रत्येकी 38, पारनेर व श्रीगोंदा प्रत्येकी 37, जामखेड 28, अकोले 21, कोपरगाव 17, अहमदनगर महापालिका क्षेत्र 15, राहाता 13, नगर ग्रामीण 11, अन्य जिल्ह्यातील पाच व भिंगार लष्करी परिसरातील अवध्या एका रुग्णाचा त्यात समावेश आहे.

