पठार भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत! जलस्त्रोतही अद्याप कोरडेठाकच; हंगाम वाया जाण्याची भीती

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असूनही कायमच दुष्काळाच्या झळा बसतात. गेल्या वर्षी खरीप हंगाम अक्षरशः पाण्यात गेला. तर यंदा बरोबर याच्या उलट चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कोरोनाने हतबल झालेला शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे. जर पठारभागातील जलस्त्रोतही भरले नाही तर पिण्याचे पाण्याचे हाल देखील होतील. यामुळे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे खिळल्या आहेत.

पठारभागात मोठ-मोठे डोंगर, दर्‍या, ओढे-नाले, वनसंपदा, प्रवरा व मुळा नदी असे सर्वकाही असूनही कायमच दुष्काळ सोसावा लागतो. येथील शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते तन जमीनही लवकरच पाण्याचा निचरा होणारी आहे. त्यातच परिसरात जलस्त्रोतांचे प्रमाणही अत्यल्प असल्याने कामच पाण्यासाठी वणवण करावी लागते. जणूकाही दुष्काळ हा पठारभागवासियांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. गेल्या दीड वर्षापासून कोविड संकटाने शेती व्यवसाय अक्षरशः उध्वस्त झाला आहे. जे उत्पादन काढले त्यालाही बाजारभाव नाहीये. अशाही परिस्थितीत मोठ्या हिंमतीने यंदा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कर्ज, हातउसने पैसे घेऊन पीक घेतले. परंतु, निसर्गाची अवकृपा होऊन वरुणराजाने अक्षरशः पाठ फिरवली आहे. त्यामुळे पठारभागातील शेतकर्‍यांचे हक्काचे उत्पन्न असलेले शेंद्री कांदा, वटाणा, टोमॅटो आदी पिके कात टाकू लागली आहेत.

मुळा नदीचे लाभक्षेत्र असल्याने परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली असली तरी छोटे-मोठे जलस्त्रोत अद्यापही कोरडेठाक आहेत. त्यामुळे शेंद्री कांदा आणि टोमॅटोचे आगार म्हणून ओळख असलेल्या पठारभागातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तर पिंपळगाव देपा, मोधळवाडी, खंडेरायवाडी या भागातील टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी टँकरचे विकत पाणी घेवून फड जगवले आहेत. जर यापुढेही पावसाने हुलकावणी दिली तर खरीप हंगाम वाया जाण्याबरोबर पुढील हंगाम कसे काढायचे असा यक्षप्रश्नही शेतकर्‍यांना पडला आहे. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे खिळल्या आहेत.

Visits: 44 Today: 1 Total: 438624

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *