वनहक्क जमीनधारक शेतकर्‍यांचा स्वातंत्र्य दिनी उपोषणाचा इशारा! जिल्हा बँकेकडून पोटखराबा क्षेत्राला पीक कर्ज देण्यास अडवणूक

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सातबारा उतार्‍यावर पोटखराबा क्षेत्र नमूद असल्याने व ही मोजणी 1830 च्या दरम्यान झालेली आहे. तसेच वनहक्क जमिनी लाभार्थ्यांनी लागवडीयोग्य केल्या असल्याने बँकेच्या उद्दिष्टाप्रमाणे पीक कर्ज वितरण करणे आवश्यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व अग्रणी बँकेने दिले आहेत. असे असतानाही जिल्हा सहकारी बँकेकडून पीक कर्ज देण्यास अडवणूक होत असल्याच्या निषेधार्थ टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथील वनहक्क जमीनधारक शेतकर्‍यांनी 15 ऑगस्टपासून तालुका विकास अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

टाकळीभान येथे गट क्रमांक 63, 74, 150, 151 मध्ये अंदाजे 60 हेक्टर एवढे क्षेत्र मागासवर्गीय व माजी सैनिक यांना सरकारकडून देण्यात आले आहे. या क्षेत्राच्या 7/12 उतार्‍यावर पोटखराबा अशी नोंद असल्याने जिल्हा सहकारी बँकेकडून सहा महिन्यांपासून या क्षेत्रावर पीक कर्ज देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांनी जिल्हा सहकारी बँकेकडून होणार्‍या अडवणुकीसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन पाठवून उपोषणाचा इशारा दिला आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, आमच्या 7/12 उतार्‍यावर पोटखराबा अशी नोंद आहे. त्यामुळे येथील जिल्हा सहकारी बँक शाखा पीक कर्ज देत नाही. आम्ही सर्व शेतकरी मागासवर्गीय व माजी सैनिक आहोत. वास्तविक आम्हांला जिल्हा सहकारी बँकेकडून गेली पन्नास वर्षे या पोटखराबा क्षेत्रावर नियमित पीक कर्ज दिलेे आहे. मात्र सहा महिन्यांपासून टाकळीभान शाखा पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे आम्हांला जिल्हा सहकारी बँकेकडून पूर्ववत पीक कर्जाचा पुरवठा करण्यात यावा. अन्यथा सर्व शेतकरी 15 ऑगस्टपासून जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर येथील तालुका विकास अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर माजी सभापती नानासाहेब पवार, राहुल पटारे, अविनाश लोखंडे, चित्रसेन रणनवरे, नवाज शेख, नारायण काळे, मधुकर कोकणे, भागवत रणनवरे, कारभारी रणनवरे, भैय्या पठाण, अजिज पठाण, आशा रणनवरे, विमल कांबळे, किशोर जाधव, पुंजा जाधव, एकनाथ रणनवरे, पेत्रस रणनवरे, अशोक गांगुर्डे, दयानंद रणनवरे, पोपट रणनवरे, अनिल चितळे, अशोक रणनवरे, वाल्मिक संत, गोरख नवघणे आदिंच्या सह्या आहेत.

या पोटखराबा क्षेत्राबाबत वरिष्ठांचे आदेश होऊन तलाठी कार्यालयाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. याबाबतचे प्रकरण मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडून या सर्व गट क्रमांकाची मोजणी होऊन वरीष्ठ अहवाल प्राप्त झाल्यावर पोटखराबा नोंद रद्द होऊन लागवडीयोग्य क्षेत्र असा उल्लेख करण्यात येईल.
– अरुण हिवाळे (कामगार तलाठी, टाकळीभान)


जिल्हा सहकारी बँकेत सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप सुरू आहे. येथील शाखेत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने चौकशीची मागणी करण्यात आलेली असताना राजकीय दबावापोटी चौकशी केली जात नाही. पोटखराबा क्षेत्रावरील लाभार्थी शेतकरी अनेक वर्षांपासून या क्षेत्रावर सोसायटीकडून कर्ज घेत आहेत. काही शेतकर्‍यांकडे आजही कर्जाची थकबाकी आहे. मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी कर्जाची फेड केलेली असताना प्रामाणिकपणे कर्जफेड करणार्‍या मागासवर्गीय, आदिवासी व माजी सैनिक शेतकर्‍यांची येथील शाखेकडून अडवणूक होणे हे अन्यायकारक आहे.
– नानासाहेब पवार (माजी सभापती, बाजार समिती श्रीरामपूर)

Visits: 12 Today: 1 Total: 114985

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *