नांदूर ते साकूर रस्त्याची वाळू वाहतुकीमुळे लागली वाट! महसूल व पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; प्रवाशांना होतोय नाहक त्रास

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर ते साकूर रस्त्यावर जड वाहतूक आणि वाळू वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून याचा दुचाकीस्वारांसह छोट्या वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे.

नांदूर ते साकूर हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम झाले आहे. मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून वाळूचे डंपर जाऊन हा रस्ता ठिकठिकाणी उखडून खड्डेच खड्डे पडले आहेत. तरीही वाळूतस्करांना त्याचे काहीही देणे घेणे नाही. सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने खड्डे अधिकच मोठे झाले आहे. यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकीस्वारांसह छोट्या-मोठ्या वाहनचालकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने अनेक वाळूतस्करांनी या रस्त्याने येण्याचेच बंद केले असून थेट हिवरगाव पठार ते माहुली फाटा रस्त्याने वाहतूक करत आहे. आधीच या रस्त्याचे डांबरीकरण अनेक वर्षांनंतर झाले आहे. त्यातच आता वाळूचे डंपर जाऊ लागल्याने याची देखील अवस्था लवकरच ‘नांदूर ते साकूर’ रस्त्यासारखी झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तत्पूर्वी पठारभागात राजरोसपणे वाळू उपसा होत असतानाही महसूल व पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने सामान्य जनता नाहक भरडली जात आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *