देवळाली प्रवरा येथे तरुणावर ब्लेडने वार
नायक वृत्तसेवा, राहुरी
घरात झोपलेल्या तरुणाला आरडाओरड करून उठविले आणि ब्लेडने वार करत लाकडी दांड्याने मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे 2 ऑगस्ट रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, विजय सुनील आडसूळ (रा. देवळाली प्रवरा) हा 2 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्या घरात झोपला होता. त्यावेळी सुधीर उर्फ सुक्या हा अनाधिकाराने त्याच्या घरात घुसला आणि मोठमोठ्याने आरडाओरड करून ‘तुझा भाऊ अजय कोठे आहे?’ असे म्हणाला. त्यावर विजय म्हणाला, काय झाले? तु मोठ्याने घरात आरडाओरडा करू नको. असे म्हणाल्याचा राग येऊन त्याने शिवीगाळ करून ब्लेडने वार केले. तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली. तुझा भाऊ अजय यास समजावून सांग नाहीतर तुमच्या सर्व कुटुंबाला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही सुधीर उर्फ सुक्याने दिली. याबाबत राहुरी पोलिसांत विजय आडसूळ याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुधीर उर्फ सुक्या याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.