शिक्षण मंदिरात पोहोचण्यासाठी चिमुरड्यांचा जीवघेणा प्रवास! म्हाळुंगी नदीवरील तुटका पूल; विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्यांचा शॉर्टकट धोकादायक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रवरा परिसराला संगमनेर शहराशी जोडणारा म्हाळुंगी नदीवरील वाहता पूल खचून अडीच महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांना याचिकांच्या कोंडाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्गच गवसत नसल्याने या पुलाबाबत अद्याप कोणताही निर्णय होवू शकलेला नाही. या भागातील हजारो रहिवाशी आणि विद्यार्थ्यांची नित्य अडचण लक्षात घेवून पालिका प्रशासनाने पुरात वाहून गेलेला कच्चा पूल तयार केला. मात्र त्यावरील प्रवासातून मोठा हेलपाटा पडत असल्याने बहुतांशी नागरिक आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहतूकदार आजही ‘त्या’ खचलेल्या पुलावरुनच प्रवास करीत असून त्यांच्या या शॉर्टकटमधून एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता वारंवार निर्माण होत आहे.

पर्जन्यछायेखाली मोडणार्या अकोले तालुक्यातील उत्तरेकडील भागासह संपूर्ण संगमनेर तालुक्यात उशीराने दाखल झालेल्या मान्सूनने दीर्घकाळ मुक्काम ठोकल्याने यंदा म्हाळुंगी नदीला वारंवार पूर येण्याच्या घटनांसह पावसाळ्यात प्रवरेपेक्षाही प्रदीर्घकाळ वाहण्याचा विक्रम नोंदविला गेला. त्यातच उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अमृतवाहिनीपेक्षा म्हाळुंगीचा प्रवाह अधिक वेगवान असल्याने वारंवार दुथडी भरुन वाहिलेल्या म्हाळुंगीने काही शेतकरी बांधवांच्या जमिनींसह सुरुवातीच्या टप्प्यातच म्हाळुंगी नदीतून हिरेमळ्याकडे जाणारा कच्चा पूल वाहून नेला. मात्र या पुलाला पर्याय म्हणून साई मंदिराकडे जाणारा मोठा पूल मात्र सुरक्षित राहिल्याने या परिसरातील रहिवाशी आणि आदर्श विद्यालयासह ओहरा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर त्याचा कोणताही परिणाम जाणवला नाही.

मात्र, अडीच महिन्यांपूर्वी 13 ऑक्टोबररोजी याच पुलावर पालिकेच्या पाईपलाईनचे काम सुरु असताना स्वामी समर्थ मंदिराकडील बाजूने सदरचा पूल खचत असल्याची बाब पालिकेच्या कर्मचार्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना माहिती दिल्यानंतर प्रशासनाने तातडीची पावलं उचलताना सदरील पुलावरुन होणारी वाहतूक थांबवली. त्यानंतरच्या काही तासांतच सदरचा पूल एका बाजूने पूर्णतः खचल्याने जवळपास पाच ते सात फूट तिरकसपणे खाली गेला. त्यामुळे या भागातील रहिवाशी आणि विद्यार्थ्यांना अकोले रस्त्यावरुन कासावाडीकडील मार्गाने जवळपास तीन किलोमीटरचा हेलपाटा मारुन जाण्याची वेळ आली. कोणताही दुसरा पर्यायच शिल्लक नसल्याने सुरुवातीला वाहनांची सोय असलेल्यांना या मार्गाचा तर वाहनच नसलेल्यांनी धोकादायक पद्धतीने खचलेल्या पुलावरुनच आपली वर्दळ कायम ठेवली.

या दरम्यान म्हाळुंगी दुथडी वाहत असल्याने प्रशासनाची इच्छाशक्ती असतानाही त्यांना काही करता येत नव्हते. त्यामुळे एकीकडे हेलपाटा पडल्याने नागरिकांमधून उमटणारा नाराजीचा सूर आणि दुसरीकडे धोक्याकडे दुर्लक्ष करुन खचलेल्या पुलावरुन होणारी वर्दळ अशा दुहेरी चक्रात प्रशासन अडकले होते. अखेर 27 ऑक्टोबर रोजी भोजापूरच्या पाणलोटातील पावसाचा जोर मंदावल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी काही प्रमाणात खालावली, मात्र त्याचवेळी हवामान खात्याने पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा इशाराही दिल्याने त्याच दिवशी पालिकेने विपरित परिस्थितीतही यंत्रसामग्रीचा वापर करीत तीन दिवसांत हिरेमळा, वेताळमळा व घोडेकर मळ्यातील नागरिकांसाठी पूर्वी अस्तित्त्वात असलेला कच्चा पूल पुन्हा उभा केला आणि 31 ऑक्टोबरच्या सायंकाळी तो वाहतुकीसाठीही खुला झाला. त्यामुळे वरील भागासह साईनगर, पंपींग स्टेशन परिसरातील रहिवाशांसह विद्यार्थ्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या.

मात्र, या पुलावरुन साईनगर अथवा पंपींग स्टेशनकडे जाण्यासाठी असंख्य गल्लीबोळातून आणि अरुंद रस्त्यावरुन जावे लागत असल्याने कच्चापूल तयार होवूनही अनेकांनी खचलेल्या पुलावरुन धोकादायक प्रवास सुरुच ठेवला. त्यातच विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्यांना याच गल्लीबोळातून जाताना असंख्य अडचणी येवू लागल्याने व त्यात मोठा वेळ जावू लागल्याने त्यांनी त्यावरील उपाय शोधताना धोकादायक ‘शॉर्टकट’ स्वीकारला. सद्यस्थितीत दिगंबर गणेश सराफ शिक्षण संस्थेच्या आदर्श शाळेतील प्राथमिक वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे बहुतेक सर्वच वाहतूकदार खचलेल्या पूलाजवळ आपले वाहन उभे करतात. एकाचवेळी त्यांची तीन ते चार वाहने आल्यानंतर त्यातील एक चालक वरती, एक मधल्या बाजूच्या पडक्या स्लॅबच्या अतिशय धोकादायक घसरत्या उतारावर आणि एकजण साईमंदिराकडील बाजूने शिल्लक राहिलेल्या पुलावर थांबून या चिमुरड्यांना जीव धोक्यात घालून शाळेत पोहोचवतात.

हा संपूर्ण प्रकार अतिशय धोकादायक आणि वाहतुकदारांसह विद्यार्थ्यांचाही जीव धोक्यात घालणारा आहे. सदरच्या खचलेल्या पुलाखालील एका कॉलमचा भरावच वाहून गेलेला असल्याने अधांतरीत लटकलेला स्लॅबचा ‘तो’ तुकडा कधीही नदीपात्रात कोसळू शकतो. सध्या त्यावरुनच वाहतूक सुरु असल्याने हा धोका सतत जाणवत असतो. मात्र तीन किलोमीटरचा हेलपाटा मारुन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवायचे असेल तर वाहतूकदाराला एकूण बारा किलोमीटरसाठी अतिरिक्त इंधन खर्च करावे लागते. त्याचा वाढीव खर्च देण्यास विद्यार्थ्याचे पालक राजी होत नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्यांचाही नाईलाज झाल्याने त्यांनी आपल्यासह विद्यार्थ्यांचाही जीव धोक्यात घालून हा प्रयोग सुरु केला आहे. मात्र त्यातून सतत दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने खचलेल्या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा या भागातील रहिवाशी व विद्यार्थ्यांचे पालक व्यक्त करीत आहेत. मात्र सध्या पालिकेत प्रशासक राज असल्याने त्यांनाही कायदेशीर मर्यादा आहेत. त्यामुळे हा प्रश्न कधी सुटेल याबाबत आजतरी अनिश्चितता कायम आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत अद्यापही संभ्रम कायम असल्याने अडीच महिन्यापूर्वी खचलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलाबाबत अद्याप कोणताही निर्णय होवू शकलेला नाही. सध्या पालिकेत प्रशासकीय राज असून त्यांना गावगाडा हाकताना मर्यादांचे पालनही करावे लागत असल्याने त्यांच्याकडून इतक्या मोठ्या तरतुदीचे काम कायद्याच्या दृष्टीने अशक्य आहे. हे माहिती असल्यानेच प्रशासनाने यापूर्वीच हातात असलेल्या कच्च्या पुलाचे काम पूर्ण करुन तात्पुरती सोय करुन दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत पालिकेच्या निवडणुका होवून नवीन कौंसिल ठराव करीत नाही, तोपर्यंत या भागातील रहिवाशी आणि विद्यार्थ्यांना अशीच जीवघेणी कसरत करावी लागणार आहे हे निश्चित.

