तालुक्याच्या पठारभागात वाळू तस्करांचा धिंगाणा सुरुच! महसूलमधील ‘लाचखोर’ आणि तलाठ्यांचे संगनमत; पकडलेल्या ‘ढंपर’मधील निम्मी वाळू गायब..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे प्रयागराजमध्ये पार पडलेल्या कुंभेळ्याच्या सुरस कथा आजही चर्चील्या जात असताना दुसरीकडे मोठा प्रागैतिहास बाळगणार्या संगमनेर तालुक्यातील नद्यांच्या पात्रात मात्र वाळू तस्करांचा धिंगाणा सुरुच असल्याचे दुर्दैवी चित्र बघायला मिळत आहे. राज्यात महायुतीने ऐतिहासिक बहुमतासह संगमनेरातही परिवर्तन घडवल्यानंतर तालुक्याला लागलेला वाळू तस्करीचा कलंक पुसला जाण्याची अपेक्षा होती. मात्र महसूलमधील काही लाचखोर आणि स्थानिक तलाठ्यांच्या हव्यासामुळे ती फोल ठरली असून तालुक्याच्या पठारभागात तर, मुळानदीच्या पात्रावर दररोज दरोडे पडत आहेत. धक्कादायक म्हणजे स्थानिकांच्या तक्रारीनंतर कारवाईसाठी येणार्या ‘महसूल पथका’कडून नद्यांऐवजी तस्करांचीच अधिक काळजी घेतली जात असल्याचेही समोर आले असून मंगळवारी रात्री पकडलेल्या एका ढंपरमधील निम्मी वाळू पथकाच्या उपस्थितीतच ‘गायब’ करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या या ‘ढंपर’वर अद्याप कोणतीही कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यावरुन महसूलचे लाचखोर वाळू तस्करांशी तडजोडीत व्यस्त असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता.4) रात्रीच्यावेळी पठारावरील मुळानदीच्या पात्रातून ढंपरद्वारा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असल्याची माहिती स्थानिकांनी महसुलच्या कर्मचार्यांना कळवली. अर्थात सदरचा उपसा सुरु असल्याबाबत स्थानिक पातळीवर मंडलाधिकारी आणि तलाठ्यांना त्याची माहिती नव्हती असं कोणी म्हणालं तर आश्चर्यच निर्माण होईल. मात्र हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्यात कॅमेर्यासह कॉल रेकॉर्डिंगची सुविधाही उपलब्ध असल्याने पथकानेही आधीच फाटलेली वेशीवर यायला नको म्हणून कारवाईची रुजवात केली. त्यात मुळानदीतून खचाखच वाळू भरुन बाहेर पडलेला एक ढंपर (क्र.एम.एच.17/बी.वाय.7297) पथकाच्या दृष्टीस पडताच त्याचा पाठलाग करीत तो थांबवण्यात आला.

यावेळी पथकातील सदस्यांनी केलेल्या पाहणीत ढंपरच्या पाठीमागील बाजूस सुमारे साडेचार ब्रासपेक्षा अधिक वाळू भरल्याचे दिसून आले. मात्र दरम्यानच्या अल्प कालावधीतही संबंधित वाळू तस्कराला आपला ढंपर पकडला गेल्याचे समजताच त्याने घटनास्थळी धाव घेत पथकासमोर गाजरं फेकायला सुरुवात केली. मात्र सदरची कारवाई वरीष्ठांना मिळालेल्या माहितीच्या आधारे होत असल्याने ढंपर सोडून दिला अथवा रिकामा असल्याचे दाखवले तर आपल्याच नोकरीवर संक्रांत येईल या विचारातून तोंडाला पाणी सुटलेल्या पथकाने ढंपरमधील निम्मी वाळू रस्त्याच्या कडेलाच ओतून निम्म्या वाळूसह सदरचा ढंपर मंगळवारी (ता.4) रात्री घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून उभा केला. या कारवाईला आज 36 तासांचा कालावधी उलटला आहे. मात्र त्याबाबत ना घारगाव पोलीस ठाण्यात कोणता गुन्हा दाखल झाला, ना महसूल विभागाकडून कोणती कारवाई झाल्याचे समोर आले.

त्यावरुन सदरील वाळू तस्कराला नेहमीप्रमाणे दंडाच्या दिखावा नोटीसा बजावून नंतर तडजोडीतून प्रकार संपवण्याचा निर्णय झाल्याची शंका येवू लागली असून महसूल विभागाच्या या लाचखोर भूमिकेमुळे पठारभागात संताप निर्माण झाला आहे. याबाबत काहींनी नूतन आमदार अमोल खताळ यांनाही पकडलेल्या ढंपरसह महसूलच्या पथकाने आपल्या उपस्थितीत रस्त्यातच वाळू टाकून पंचनाम्याचा भार कमी केल्याची छायाचित्रे शेअर केली असून नद्यांच्या अस्तित्वालाच जेसीबीचा पंजा लावणार्या तालुक्यातील वाळू तस्करांच्या मालमत्तांची चौकशी करुन त्यांच्यावर ‘मोक्का’ कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे. याबाबत संगमनेरच्या तहसीलदारांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातून वाहणार्या मुळानदीच्या पात्रात गावोगावी वाळू तस्करांच्या टोळ्या निर्माण झाल्या असून त्यांच्याकडून असंख्य ट्रॅक्टर, ढंपर, हायवांमधून जेसीबीच्या सहाय्याने बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. गेल्या दहा वर्षांत काँग्रेस गवताप्रमाणे तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पात्रात फोफावलेल्या या टोळ्यांनी नद्यांची अक्षरशः वाट लावली असून त्याचे दुष्परिणाम आता नद्यांवर जलस्रोत अवलंबून असलेल्या शेतकर्यांना भोगावे लागत आहेत. मात्र त्या उपरांतही वाळू तस्करांची भूक शमत नसल्याने आता नद्यांच्या काठावरील शेतकरी आणि रहिवाशीच आक्रमक होवू लागले असून त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित आमदारांनी तालुक्याला लागलेला वाळू तस्करीचा कलंक पुसण्यासाठी अशाप्रकारे बिनधास्त गौणखनिज चोरणार्यांवर ‘मोक्का’नुसार कारवाईसाठी प्रयत्न करावेत अशीही मागणी आता समोर येवू लागली आहे.

