चार बँकांना सहा कोटीहून अधिक रुपयांना गंडवणारा ‘महाठग’ सापडेना! पोलिसांची भूमिका संशयास्पद; सोनेतारण कर्जदारांकडून अद्याप कोणतीही तक्रार नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील समृद्ध बाजारपेठेतून होणारी मोठी आर्थिक उलाढाल पाहून संगमनेरात दाखल झालेल्या विविध बँकांना ठगवणार्या जगदीश लक्ष्मण शहाणे या ‘महाठगा’चे एकामागून एक कारनामे समोर येवूनही शहर पोलिसांना अद्यापही या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत या महाठगा विरोधात फसवणुकीचे तब्बल चार गुन्हे दाखल झाले असून त्यात त्याने 196 कर्जप्रकरणांमधून 6 कोटी 10 लाख 12 हजार 116 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यातील पहिल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळताच तो कुटुंबासह पसार झाला. तेव्हापासून त्याच्यावर एकूण चार गुन्हे दाखल होवूनही शहर पोलिसांना अद्यापही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. मात्र या दरम्यान त्याने काही कर्जदारांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहितीही दैनिक नायकला प्राप्त झाली असून असे असतांनाही पोलिसांना मात्र त्याचे ‘लोकेशन’ मिळत नसल्याने या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद दिसू लागली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत सुमारे दोनशे कर्जदारांवर गुन्हा दाखल होवूनही त्यातील एकानेही शहाणे याने आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली नसल्याने या प्रकरणाचे गांभीर्यही प्रचंड वाढले आहे.

संगमनेरातील मालदाड रोडवर राहणारा जगदीश लक्ष्मण शहाणे (पंढरपूरकर) हा महाठग शहरात अलिकडच्या काळात सुरु झालेल्या अनेक बँका आणि पतसंस्थांचा सुवर्णपारखी (गोल्ड व्हॅल्युअर) म्हणून कार्यरत होता. या दरम्यान गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत त्याने विविध चार बँकांमधून 196 सोनेतारण कर्ज प्रकरणांमधून 6 कोटी 10 लाख 12 हजार 116 रुपयांचे तारण केलेले सोने खरे असल्याचे बँकांना भासवून सर्व प्रकरणे मंजूर केली आहेत. गेल्या फेब्रुवारीत त्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत त्याने केलेल्या 137 प्रकरणातील 33 कर्जप्रकरणांत बनावट सोने आढळून आल्यानंतर या महाठगीला पहिल्यांदा वाचा फुटली. मात्र त्या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामीन मिळवला आणि ठगीचे कोट्यावधी रुपये घेवून पसार झाला तो आजवर गायब आहे.

या दरम्यानच्या काळात 20 मार्च रोजी नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेतही त्याने 136 जणांच्या संगनमताने तब्बल 4 कोटी 20 लाख 15 हजार 860 रुपयांचे सोने तारण ठेवून त्या बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. तर त्या पाठोपाठ जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेत 36 खात्यांद्वारे 22 आरोपींनी 82 लाख 57 हजार 834 रुपये व गेल्याच आठवड्यात समोर आलेल्या प्रवरा सहकारी बँकेतील आठ प्रकरणांमधून 38 लाख 44 हजार 442 रुपयांची रक्कम बनावट सोने तारण ठेवून त्याने प्राप्त केल्याचे उघड झाले आहे. एकामागून एक बँकांमध्ये झालेले हे सोने घोटाळे समोर आल्यानंतर वैभवशाली शहर म्हणून जिल्ह्यात लौकीक असलेल्या संगमनेरातील बँका आणि पतसंस्थांचे धाबे दणाणलेले असतांना पोलिसांना मात्र अद्यापही या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचे धक्कादायक वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे.

गेल्या दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या बनावट सोने प्रकरणात आत्तापर्यंत चार प्रकरणांमधून 199 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील पहिले तीन गुन्हे दाखल होवून दहा ते पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र शहर पोलिसांनी मुख्य सूत्रधार जगदीश शहाणे याच्यासह एकाही कर्जदाराला अद्यापपर्यंत शोधण्याचा अथवा चौकशीकामी त्यांना पोलीस ठाण्यात हजर करण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. त्यातच शहरातील एक विधीज्ञ (वकिल) या प्रकरणांमधील काही कर्जदारांना पोलिसांकडे 41 प्रमाणे जवाब नोंदवून यातून सुटका करुन देण्याचे आमिष दाखवित असल्याची माहितीही समोर आली असून हे वकिल महाशय परस्पर ‘आपल्यासाठी’ की ‘पोलिसांसाठी’ पैसे जमा करीत आहेत याचीही चर्चा कर्जदारांमध्ये सुरु झाली आहे. यापूर्वीही अशाच पद्धतीने एका वकिलाने उद्योग केला होता, मात्र काही माध्यमांनी त्यावर लक्ष्य केंद्रीत करताच त्याने जमा केलेले पैसे पुन्हा देवून टाकल्याचीही माहिती उपलब्ध आहे.

कोट्यवधी रुपयांना गंडा घालून पोलिसांसमोरुन राजरोस गायब झालेला मुख्य सूत्रधार जगदीश शहाणे याला शोधण्यासाठी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत कोणतीही हालचाल केलेली नाही. विशेष म्हणजे त्याच्या ठावठिकाण्याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचेही सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र हा महाठग दररोज वेगवेगळ्या कर्जदारांशी संवाद साधीत असून ‘आम्ही बँकेत दिलेले सोने खरेच होते’ असे पोलिसांना सांगण्याचे सल्ले त्यांना देत आहे, मात्र त्याचवेळी पोलिसांना त्याचे ‘लोकेशन’ मात्र सापडत नसल्याचे सांगितले जात असल्याने ठगीच्या या प्रकरणात आता पोलिसही सहभागी झाले की काय? अशीही शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी एकतर धडक कारवाई करण्याची अथवा या माध्यमातून जमा झालेले संशयाचे मळभ दूर सारण्याची गरजही यानिमित्ताने समोर आली आहे.

चार बँकांमधील एकूण 196 प्रकरणांमध्ये झालेल्या या फसवणूक प्रकरणात अद्यापपर्यंत एकाही कर्जदाराने पोलीस ठाण्यात येवून आपण जगदीश शहाणे याच्याकडे अथवा बँकेकडे खरे सोने दिल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे सांगितलेले नाही. अर्थात यातील बहुतेक प्रकरणात शहाणे नावाच्या या महाठगाने केवळ व्यक्तिंचा वापर केला आहे, प्रत्यक्षात बँकेत ठेवण्यात आलेले बनावट सोने हे त्याच्याकडीलच असल्याचीही माहिती आहे. मात्र काही प्रकरणांत कर्जदाराने स्वतःचे खरे सोने देवूनही त्यांचा समावेश आरोपींच्या यादीत असल्याने त्यांनी पुढे येवून बँक आणि शहाणे यांच्याविरोधात तक्रार देण्याची गरज आहे.

