‘पहिली बेटी धनाची पेटी’ म्हणून मुलीचे केले जंगी स्वागत! बोटा येथील मुसळे व डावखर कुटुंबियांचे होतेय सर्वत्र कौतुक

नायक वृत्तसेवा, घारगाव
मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणारा छळ.. नकोशी म्हणून केला जाणार तिरस्कार.. त्यातही भयंकर म्हणजे मुलगी नको म्हणून केल्या जाणार्‍या गर्भलिंग निदान चाचण्या.. असे अनेक गंभीर प्रकार नेहमी घडतात. परंतु, आता काळ बदलला आहे आणि आता मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्याच्या सुखद घटनाही कानावर येत आहेत. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा येथील मुसळे कुटुंबियांनी ‘पहिली बेटी धनाची पेटी’ म्हणून एकुलत्या एक मुलीच्या जन्माचे स्वागत फुलाच्या पायघड्या टाकत केले आहे. यामुळे परिसरात सर्वत्र हा कौतुकाचा विषय ठरत आहे.

बोटा येथील सुरेश कारभारी मुसळे, अनिल कारभारी मुसळे, शिवाजी कारभारी मुसळे या तिघा भावंडाच्या कुटुंबात स्मिता ही एकुलती एक मुलगी. डावखर कुटुंबात तिचे लग्न झाले. सोमवारी (ता.26) स्मिता सुधाकर डावखर यांनी आपल्या पहिल्या कन्यारत्नाला रुग्णालयात जन्म दिला. यामुळे मुसळे व डावखर कुटुंबात बर्‍याच दिवसांनी कन्यारत्न जन्माला आल्याने घरात जणू लक्ष्मीच आल्याची भावना व्यक्त केली. शनिवारी रुग्णालयामधून स्मिता डावखर या माहेरी बोटा येथे आल्या असता मुसळे कुटुंबियांनी एकुलत्या एक मुलीच्या कन्यारत्नाचे घरात पाहिले पाऊल पडावे म्हणून जंगी तयारी केली होती. यावेळी डावखर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी तेथे उपस्थितांनी स्मिता यांच्यासह कन्यारत्नाचे औक्षण करत फुलांच्या पायघड्या टाकत स्वागत केले. यावेळी घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधून मायलेकींचे स्वागत केले. हा स्वागत सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकीकडे नकोशी म्हणून हिणवणी होणार्‍या मुलीचे मुसळे व डावखर कुटुंबियांनी मोठ्या हर्षोल्हासात स्वागत केल्याने परिसरात सर्वत्र हा कौतुकाचा विषय ठरत आहे.

Visits: 205 Today: 1 Total: 2123169

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *