खेलो इंडिया महिला योगासन लीगचे आयोजन! महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम; ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये रंगणार स्पर्धा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र व गोवा या राज्यातील महिलांसाठी महिला दिनाच्या निमित्ताने ‘खेलो इंडिया – दस का दम’ या नावाने योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या 12 मार्च रोजी पुण्यातील सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारच्या स्पर्धा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.
वय वर्ष 9 ते 18 आणि 19 ते 55 अशा दोन गटांत होणार्या योगासन स्पर्धेत पारंपरिक व कलात्मक या दोन क्रीडा प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारात महाराष्ट्र आणि गोव्यातील कोणत्याही महिला स्पर्धकाला सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी तयार केला गेलेला अभ्यासक्रम नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशनच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याचे स्पर्धेच्या तांत्रिक प्रमुख स्नेहल पेंडसे यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी कोणतेही सहभाग शुल्क आकारले जाणार नाहीत. पुण्याशिवाय राज्यातील कोणत्याही भागातून येणार्या महिला स्पर्धकांसाठी ध्रुव ग्लोबल स्कूलच्यावतीने शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकासह पुणे रेल्वेस्थानकावरुन स्पर्धास्थानी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 81496 02867 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धा व्यवस्थापक डॉ. सुनंदा राठी यांनी केले आहे. रविवार 12 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या स्पर्धा होणार आहेत. एकूण बारा विजेत्यांना पारितोषिके व सर्व स्पर्धकांना सहभागासाठी प्रशस्तिपत्र दिले जाणार असल्याचे स्पर्धा समन्वयक शुभदा भाटे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील महिला योगासन क्रीडापटूंनी या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सचिव उमेश झोटिंग यांनी केले आहे.