कौतुकास्पद! वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याने वाटले मास्क… बोटा येथील गरीब कुटुंबातील ‘वाहिद’चा अनोखा उपक्रम
नायक वृत्तसेवा, घारगाव
सध्या कोरोनाचे संकट पुन्हा गडद झाल्याने सरकार अधिक सतर्क झाले आहे. प्रशासनातील संबंधित विभाग कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाचा समाजातील स्वयंसेवी वृत्तीने काम करणारेही कोरोना योद्धे आपापल्या परीने योगदान देत आहे. याचाच भाग म्हणून संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील नाथाबाबा विद्यालयाचा सातवीच्या वर्गातील गुणी व शिस्तप्रिय विद्यार्थी वाहिद राजू इनामदार या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याने कोरोना महामारीमध्ये आपलेही मदतीचे योगदान असावे; या उदात्त हेतूने आपला वाढदिवस साजरा न करता विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत मास्कचे वाटप केले. त्याच्या या सामाजिक जाणिवेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
सातवीच्या वर्गातील वाहिदचे खरेतर हे खेळण्या-बागडण्याचे आहे. घरची परिस्थिती तशी जेमतेमच आहे. आई अंजुमन ही देखील नाथाबाबा विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिवण काम करते. तर वडील वाहन चालवून हातभार लावतात. अशाही परिस्थितीत कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढू लागले असल्याने काहीतरी मदत करण्याचा विचार वाहिदच्या मनात आला. त्याने आई-वडीलांशी चर्चा करुन मला वाढदिवसानिमित्त माझ्या शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणींना मोफत मास्क वाटप करायचे आहे. त्यावर त्यांनीही तत्काळ होकार दिला. आईने आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन दिवस दर्जेदार मास्क घरीच शिवले.
त्यानंतर वाहिदने वाहीदने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नाथाबाबा विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप केले. या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले आणि वाहिदच्या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले. कुटुंबाची जेमतेम परिस्थिती असताना देखील कोरोना संकट ओळखून वाहिदने कोरोना लढ्यात आपले योगदान दिले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाचे स्वागत करुन प्राचार्य बाळासाहेब आहेर, पर्यवेक्षक महेंद्र जठार, संस्थेचे संचालक सताभाऊ शेळके प्रत्येकी शंभर रुपयांचे बक्षीस दिले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
वाहिदसारखे गुणी विद्यार्थी सर्वच शाळांत असावेत. आपल्या बरोबर आपल्या मित्र-मैत्रिणींच्या आरोग्याची काळजी घेवून त्याने नवा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. त्याच्या या कृतीबद्दल आम्ही सर्व धन्य झाले आहोत.
– बाळासाहेब आहेर (प्राचार्य)