शेंडेवाडी येथे जावयाची सासरच्या मंडळीला मारहाण जावयासह दोघांविरुद्ध घारगाव पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शेंडेवाडी येथे कौटुंबिक वादातून तिघांनी सासरच्या मंडळीला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता.3) मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी जावयासह दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शेंडेवाडी येथील लक्ष्मीबाई गंगाराम काळे व पती गंगाराम काळे हे दोघे बाहेर ओट्यावर झोपलेले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जावई मच्छिंद्र मनाजी जाधव, सोनबा विजय जाधव व अनोळखी इसम हे तिघे आले. त्यानंतर जावई मच्छिंद्र जाधव हा सासूस म्हणाला की, तुम्ही तुमच्या मुलीला नांदायला का पाठवत नाही? असे म्हणून सासूच्या हातावर व खुब्यावर मारहाण केली. त्यावेळी सासरा गंगाराम काळे हे उठले असता त्यांना देखील जावयाने शॉकबसरने डोक्यावर मारहाण केली. तसेच सासूचे सासरे व मुलगा हा आरडाओरडा ऐकून बाहेर आले असता त्यांना देखील मारहाण करुन शिवीगाळ केली. याचबरोबर सोनबा विजय जाधव व अनोळखी इसम यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत दमदाटी केली.

या प्रकरणी सासू लक्ष्मीबाई काळे यांनी घारगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरुद्ध गुरनं.165/2022 भादंवि कलम 326, 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष खैरे हे करत आहे.

Visits: 197 Today: 1 Total: 1984439

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *