चांदा येथील दरोड्यातील तिघा आरोपींना ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील चांदा येथे 29 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या दरोड्याच्या घटनेतील तिघा आरोपींना अटक करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. तिघेही आरोपी नेवासा तालुक्यातील असून, या सर्वांना गुरुवारी (ता.2) न्यायालयात हजर केले असता 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री चांदा येथील आडभाई व गायकवाड वस्तीवर दरोडा पडला होता. सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. अशा प्रकारचे गुन्हे करणार्या व स्थानिक गुन्हे शाखेच्या अभिलेखावर असलेल्या सराईत गुन्हेगारांचे छायाचित्र फिर्यादी व साक्षीदार यांना दाखविले. त्यातील काही छायाचित्र फिर्यादी व साक्षीदार यांनी ओळखल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे आदिंनी आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन आरोपींचा शोध घेतला.

या गुन्ह्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने डांगर उर्फ प्रवीण छगन भोसले (रा.मुकिंदपूर), सुदाम उर्फ शिवदास सुमन भोसले (रा.गेवराई, ता.नेवासा) व पंकेश उर्फ पंक्या जगताप भोसले (रा.फत्तेपूर, ता.नेवासा) यांना अटक करण्यात आली. आरोपी डांगर उर्फ प्रवीण भोसले याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात 2019 मध्ये दोन तर शिर्डी व वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी सुदाम उर्फ शिवदास भोसले याच्याविरुद्ध वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2008 मध्ये एक तर नेवासा पोलीस ठाण्यात 2021 मध्ये एक असे दोन गुन्हे दाखल आहेत.
