स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही फोफसंडी ग्रामस्थ भोगताहेत नरकयातना! भन्नाट निसर्ग सौंदर्य लाभूनही मुलभूत सुविधांपासून नागरिक वंचित

नायक वृत्तसेवा, राजूर
अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसराची ओळख आहे. येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कळसूबाई, हरिश्चंद्र गड, रतनगड, साणंद दरी, भंडारदरा धरण, निळवंडे धरण, घाटघर प्रकल्प, ओढे-नाले, धबधबे असा निसर्गाचा अविष्कार कायमच पर्यटकांना आकर्षित करत आहे. याच परिसरातील फोफसंडी गावाची विशेष ओळख आहे. घाटरस्ता, उंचच उंच डोंगरदर्यांत लपलेले हे गाव अतिशय सुंदर आहे. उंच डोंगरावरून फेसाळत येणारे धबधबे व भन्नाट वार्यामुळे पर्यटकांची पावले आपोआप इकडे वळतात. मात्र, भन्नाट निसर्ग सौंदर्य लाभलेले या गावातील ग्रामस्थ स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मात्र अक्षरश: नरकयातना भोगत आहेत.

ब्रिटीश अधिकारी फोफ यांच्या नावाने परिचित असलेल्या या फोफसंडीत सकाळी एक तास उशिरा सूर्य दिसतो, तर सायंकाळी एक तास लवकर डोंगराआड तो लुप्त होतो. पावसाळ्यात जे शेतात उगवेल, ते पदरात पाडून आठ महिने रोजंदारीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्यात येथील ग्रामस्थ जातात. म्हातारी माणसे व लहान मुले घरीच राहून जनावरे सांभाळतात. घरे जुन्या धाटणीची वीट-माती-दगड रचून वर कौले वा पत्रे टाकून बनविलेली आहेत. बोटावर मोजण्याइतकीच घरकुले मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. काही घरांत गॅसजोड आहेत, तर बहुतांश घरांत चुलीवरच स्वयंपाक बनविला जातो. गावात गिरणी, शाळा, केंद्रीय आश्रमशाळा असली तरी प्रचंड गैरसोयी आहेत. रस्ता, तसेच अनेकांच्या घरांत वीज नाही. अनेकांना घरेच नाहीत. येथील ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते अक्षरशः नरकयातना भोगत आहेत.

फोफ नावाचा ब्रिटीश अधिकारी दर रविवारी गावात यायचा. त्यामुळे गावाला फोफसंडी नाव पडल्याचे 75 वर्षीय भिवा पिलाजी वळे यांनी सांगितले. चार पिढ्यांपासून आम्ही या गावात राहतो. गावात बारा वाड्या, तसेच आवाडे, कोंडार, भगत, पिचड, तातले, गोरे, उंबरे, गवार, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशा आडनावाचे लोक येथे राहतात. जनावरे पाळणे, पावसाळ्यात भात, नागली, वरई आदी पिके घेऊन इतर आठ महिने रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्यातील कोपरे, मांडवे, ओतूर, बनकर फाटा येथे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही येथील ग्रामस्थ नरकयातना भोगत असल्याने मायबाप सरकारने एकदा तरी येथील परिस्थिती जाणून घ्यावी, अशी भाबडी आशा येथील आदिवासी बांधव बाळगून आहेत.
