अवघ्या आठ दिवसांत जखमी वारकर्यांवर यशस्वी उपचार डॉ. प्रदीप कुटेंचा रुग्णाच्या मुलाने सत्कार करत मानले आभार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिर्डी येथून आळंदीला जाणार्या पायी दिंडीतील वारकर्यांना घारगाव (ता.संगमनेर) परिसरात मालवाहू कंटेनरने धडक दिल्याने चार वारकर्यांचा मृत्यू झाला. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संगमनेर शहरातील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. साधारण सात ते आठ दिवसांत जखमींना यशस्वी उपचारांती सुट्टी देण्यात आली. याबद्दल हॉस्पिटलने केलेल्या रुग्णसेवेबद्दल जखमी वारकरी भाऊसाहेब दशरथ गायकवाड यांचा मुलगा सुनील गायकवाड यांनी डॉ. प्रदीप कुटे व डॉ. सोनाली कुटे यांचे पुष्पहार व शाल घालून आभार मानले.

सदर अपघातात जखमी झालेल्या वारकर्यांना संगमनेर शहरातील नामवंत कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यात सुनील गायकवाड यांचे वडील भाऊसाहेब दशरथ गायकवाड यांचाही समावेश होता. या जखमी वारकर्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन जखमींची आपुलकीने विचारपूस केली. तर महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जखमींना भेटून उपचारांची जबाबदारी स्वतः घेतली.

याचबरोबर कुटे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रदीप कुटे, डॉ. सोनाली कुटे, सहकारी डॉक्टर्स व सहकार्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा नाजूक परिस्थितीतून एक ते दोन दिवसांत जखमींना बाहेर काढले. याकाळात काही जखमी वारकर्यांचे नातेवाईक हजर नसतानाही हॉस्पिटल व्यवस्थापनाने आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे काळजी घेतली असल्याचा अनुभव सुनील गायकवाड यांनी सांगितला. अखेर सात ते आठ दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर सर्वांना सुट्टी देण्यात आली. सुट्टी झाल्यानंतर वडीलांच्या इच्छेनुसार डॉक्टर प्रदीप कुटेंचा छोटासा सत्कार केला. यावेळी हॉस्पिटलचे व्यवस्थापक अण्णा थोरात, सहकारी डॉक्टर्स व सर्व सहकारी उपस्थित होते.
![]()
वडीलांसह अजून एका वारकर्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी दोघेही कमीत कमी दोन महिने जागेवरून उठणार नाही असे वाटायचे. परंतु शस्त्रक्रिया झाल्यानंतर सात ते आठ दिवसांत दोन्हीही रुग्ण अक्षरशः चालायला लागले. त्यामुळे आम्ही कितीही आभार मानले तरी कमीच पडतील. डॉक्टर प्रदीप कुटे व सहकार्यांच्या ऋणातून आम्ही कधीही उतराई होऊ शकणार नाही.
– सुनील गायकवाड
