विनोदवीरांच्या हास्यजत्रेने संगमनेरात धमाल जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमांना विक्रमी गर्दी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठी चित्रपट व विविध मालिकांमधील 13 कलाकारांच्या उपस्थितीत झालेल्या हास्यजत्रा या कार्यक्रमातील विनोदवीरांनी संगमनेरकरांना खळखळून हसवले. विक्रमी गर्दीत झालेल्या या हास्यजत्रेने एकच धमाल केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित हास्यजत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, अॅड. माधव कानवडे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, बाबासाहेब ओहोळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सुवर्णा मालपाणी, शोभा कडू यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी शालू फेम विनोदवीर प्रभाकर मोरे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, ओंकार राऊत, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, सोनी मराठीची विजेती गायिका श्वेता दांडेकर, गायक प्रतीक सोळसे, अपेक्षा लोंढे, प्रथमेश माने, कार्यकारी निर्माता दशरथ शिरसाट, श्याम बांगर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डोंगरावरील वृक्षारोपणाचा धमाल विनोदी कार्यक्रम झाला. यानंतर अपेक्षा लोंढेंनी सादर केलेल्या लावणी फ्युजनमध्ये चंद्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. प्रभाकर मोरेच्या शालू या गाण्याला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तर पृथ्वीक प्रताप, रोहित माने आणि शिवाली परब यांच्या पोलीस ठाण्यामधील गोंधळाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. श्वेता दांडेकर आणि प्रतीक सोळसेने गायलेल्या विविध गीतांना तरुणांनी प्रचंड दाद दिली. तर प्रभाकर मोरे, रसिका वेंगुर्लेकर व रोहित माने यांची चित्रपट शूटिंग या कॉमेडी नाटकाने धमाल केली.
