नागरिकांबरोबरच आता प्रशासनाचेही कोविडकडे दुर्लक्ष! उपाययोजना केवळ कागदोपत्रीच; अंमलबजावणी मात्र होतच नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भरीला लागलेल्या संक्रमणाच्या आकड्यात आता ‘प्रलंबित’चीही घुसळ सुरु झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील रुग्णसंख्या अचानक एका पातळीच्या आसपास स्थिरावल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या पठारभागात कोविडचा उद्रेक होवून संक्रमण पुन्हा आटोक्यात आले तेथूनही पुन्हा मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवू लागल्याने तालुक्यात ‘लॉकडाऊनची’ भीती निर्माण होवू लागली आहे. त्यातच आजही तालुक्यातील 103 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्यात भर पडली आहे. एकीकडे संक्रमण वाढीला लग्न सोहळ्यांना दोषी ठरवले जात असताना, आता प्रशासकीय पातळीवरुनही केवळ कागदी घोडेच नाचत असल्याची माहिती समोर येत आहे. कोविडची साखळी तोडण्याच्या प्रक्रियेत रुग्णाचा संपर्क शोध हा अत्यंत महात्वाचा निकष आहे, यंत्रणेला मात्र त्याचा विसर पडलेला असल्याने तालुक्यात कोविडचा मुक्त संचार सुरु आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यात कोविड संक्रमणाची आत्तापर्यंतची सर्वात भीतीदायक बाजू आपण अनुभवली. तशी स्थिती निर्माण करण्यात कोठे ना कोठे नागरिकांचा हलगर्जीपणाच कारणीभूत होता. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत जी चूक फेब्रुवारीत झाली, त्याची पुनरावृत्ती जूनमध्ये पुन्हा सुरु झाली. त्याचा सर्वाधिक फटका तालुक्याच्या पठारभागाला व त्यातही विशेषता साकूर गटातील 20 आणि आश्वी गटातील 13 गावांना अधिक बसला. कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन विवाह सोहळे साजरे होत असताना सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कामगार पोलीस पाटील आणि ज्यांच्या जीवावर कोविड विरोधातील ग्रामीण लढाई लढली जात आहे ती ग्राम सुरक्षा समिती मात्र आपले स्थानिक ‘हितसंबंध’ जोपासण्यात आणि सोयीस्कर गप्प बसण्यातच धन्य झाली.

त्याच त्या मानवी चुकांची पुनरावृत्ती होवूनही त्यातून कोणीही बोध घेत नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहायला मिळत असून
जिल्हाधिकार्यांचा दौरा असो, की हलगर्जीपणा करणार्या शासकीय कर्मचार्यांवरील कारवाईच्या घोषणा असो. या गोष्टी स्थानिक पातळीवर मात्र केवळ ‘वल्गना’ ठरत आहेत. दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्यांनी साकूरमधील बैठकीत घरोघरी जावून आरोग्य तपासणीचे आदेश दिले, त्यानंतर दोन दिवसांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनीही साकूरमध्ये जात जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार घरोघरी ‘रुग्णशोध’ सुरु असल्याची माहिती दिली. वस्तुस्थिती मात्र यापेक्षा खूप वेगळी म्हणजे ना रुग्णशोध आणि ना तपासणी अशी असल्याचे समोर आले. यावरुन तालुक्यात वारंवार वाढणार्या संक्रमणाला नागरिकांचा बेजबाबदारपणा हमखास कारणीभूत आहे, मात्र त्यात प्रशासकीय यंत्रणांचाही तितकाच मोठा वाटा आहे हे नाकारुन चालणार नाही.

एप्रिल-मे महिन्यातील कोविडचा हाहाकार अनुभवलेली मंडळी ‘तो’ काळ भयानक म्हणून त्याला विसरली आहे. मात्र त्यातून कोणतीही शिकवण न घेता आता पुन्हा तशीच स्थिती निर्माण करण्याचा जणू सामूहिक अट्टाहास सुरु झाला आहे. त्यातच आता राज्य शासनाने सर्व व्यवसायांना आठवड्यातील सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास मुभा दिल्याने नागरिकांच्या हलगर्जीपणात आणखी वाढ होणार आहे. त्याचे स्पष्ट चित्र स्वातंत्र्य दिनापासूनच समोर यायला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच विवाह सोहळ्यांनाही आता शासकीय पातळीवरुन दोनशेच्या उपस्थितीची परवानगी मिळाल्याने त्याचे चांगले-वाईट परिणामही जिल्ह्याची स्थिती ठरविणारे असणार आहेत.

राज्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचा दावा केला जात असला तरीही संक्रमण मात्र थांबलेले नाही, याचा नागरिकांना गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत जिल्ह्यात दररोज सरासरी 789 तर संगमनेर तालुक्यात 115 रुग्ण समोर येत होते. मात्र गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातील काही ठराविक तालुक्यांसह संगमनेरातील सरासरीत धक्कादायक वाढ झाली आहे. मागील केवळ पाचच दिवसांत जिल्ह्याची सरासरी वाढून 946 वर तर संगमनेर तालुक्याची दैनिक सरासरी 146 रुग्णांवर पोहोचली आहे. संक्रमणात वाढ झाल्याचे अगदी स्पष्ट दिसत असतानाच आता जिल्हा पूर्णतः ‘खुला’ झाल्याने प्रशासनासह नागरिकांच्याही जबाबदार्या वाढल्या आहेत. मात्र मागील दोन संक्रमणाचा अनुभव पाहता यावेळीही ‘येऽरे माझ्या मागल्या..’ सारखीच स्थिती पुन्हा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लॉकडाऊनचा कालावधी संपून जेमतेम आठवडा उलटलेल्या तालुक्याच्या पठारभागातील संक्रमण आजही आटोक्यात आलेले नाही. तालुक्यातून दररोज समोर येणार्या एकूण रुग्णसंख्येत निम्मी रुग्णसंख्या आजही एकट्या पठारभागाची असते. असे असूनही ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या साकूरमध्ये बिरोबाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात, पठारभागातच सर्वोच्च न्यायालयाचे बंदी आदेश झुगारुन ‘बैलगाडा’ शर्यती होतात. या गोष्टी रोखण्याची जबाबदारी असलेले यंत्रणेतील घटक मात्र सगळे काही व्यवस्थित असल्याचा आव आणीत समोर दिसत असलेल्या भयानक संकटाकडे डोळेझाक करीत असल्याचे भयानक चित्र सध्या तालुक्यात दिसत असून येणार्या संकटाला तेच कारणीभूत ठरणार असल्याचे त्यातून दिसत आहे.

संक्रमणाचा मोठा फटका बसलेल्या पठारभागातील साकूर गटात दहा दिवसांचा ‘लॉकडाऊन’ होवूनही त्यातून ना नागरिक बोध घेत आहेत, ना प्रशासन. त्यामुळे कोविडच्या सावटाखाली साकूरच्या बिरोबाचे दर्शनही घेता येते, भाजी बाजारातही जाता येते आणि बैलगाडा शर्यतींचे आयोजन होवून यात्राही भरवते येते असेच काहीसे चित्र सध्या पठारभागात दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांपाठोपाठ आता प्रशासनाचा हलगर्जीपणाही ठळकपणे समोर येवू लागला असून प्रशासनाचे केवळ कागदी घोडेच नाचत असल्याचे दिसू लागले आहे.

