कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तरी भरचौकात मारू : आ. काळे कोपरगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पद वितरण समारंभ

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला तरी त्यांना भरचौकात मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी (ता.26) विरोधकांना दिला.

उच्चशिक्षित, शांत, मितभाषी अशी ओळख असणार्‍या आमदार काळे यांचा हा रुद्रावतार पाहून पत्रकारांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या. कार्यकर्त्यांनी पक्षाची भूमिका मांडावी. मात्र, आपल्या माताभगीनींचाही सन्मान ठेवावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत. महाराजांच्या शिकवणीनुसार आपण महिलांचा आदर ठेवावा, त्यांच्याबद्दल आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडवू नयेत याचे भान ठेवावे, असा सल्ला देण्यास आमदार काळे विसरले नाही. तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पद वितरण समारंभाप्रसंगी आमदार काळे बोलत होते.

अध्यक्षस्थानी महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव धरमकुमार बागरेचा होते. काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, शहराध्यक्ष सुनील गंगुले, गटनेते वीरेन बोरावके, उपसभापती अर्जुन काळे, नगरसेवक मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, चारुदत्त सिनगर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार काळे म्हणाले, विरोधकांना विकासकामे करायची नाहीत. जे करतात त्यांनाही आडवे येत आहे. ते स्वतःही काही करत नाहीत. मात्र, त्याचे खापर आपल्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन काहींनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांच्या घरी जावून गोंधळ घालणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. तोडीस तोड उत्तर देऊ. नगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत आपल्या प्रभागातून राष्ट्रवादीचा नगरसेवक निवडून आणण्यास शर्थीचे प्रयत्न करावे. शहराध्यक्ष सुनील गंगुले, नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, धनंजय कहार, महेश उदावंत यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश गवळी यांनी प्रास्ताविक केले.

गोंधळ खपवून घेणार नाही…
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन काहींनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांच्या घरी जावून गोंधळ घालणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. तोडीस तोड उत्तर देऊ. नगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत आपल्या प्रभागातून राष्ट्रवादीचा नगरसेवक निवडून आणण्यास शर्थीचे प्रयत्न करावे. आता कार्यकर्त्यांनी तातडीने कामाला लागावे, असा सल्लाही आमदार आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Visits: 5 Today: 1 Total: 29005

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *