सहकारमहर्षी थोरात कारखान्यातून इथेनॉल टँकर रवाना सरकारी कंपन्यांशी करार; 50 लाख लिटर इथेनॉल पुरवणार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातून सरकारी कंपन्यांसाठी पहिला इथेनॉल टँकर मंगळवारी (ता.4) रवाना झाला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल विभागातून सरकारी कंपनीला जाणार्‍या पहिल्या टँकरचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, रमेश गुंजाळ, अनिल काळे, दादासाहेब कुटे, संभाजी वाकचौरे, विनोद हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, भारत देशमुख आदिंसह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन केलेल्या 5500 मेट्रीक टन कारखाना व 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प हा संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे. या नव्या कारखान्या बरोबर कारखान्याने 40 हजार लिटर क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे आधुनिकीकरण केले आहे. तसेच इथेनॉल प्रकल्पही कार्यान्वित केला असून या प्रकल्पातून सरकारी कंपनी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड या 3 सरकारी कंपन्यांसाठी इथेनॉल देण्याचा वार्षिक करार झाला आहे. यानुसार थोरात कारखाना या सरकारी कंपन्यांना 50 लाख लिटर इथेनॉल पुरवणार आहे. नव्याने आधुनिकीकरण केलेल्या डिस्टीलरी प्रकल्पातून तयार होणार्‍या अल्कोहोलमध्ये 95 टक्के अल्कोहोल व पाच टक्के पाणी असते. इथेनॉल प्रकल्पात पाणी वेगळे केले जात असून शंभर टक्के शुद्ध इथेनॉल तयार होत असून ते शासकीय कंपन्यांना दिले जात असून ते पेट्रोलकरीता वापरण्यात येणार आहे. कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीने पुन्हा एक मानाचा तुरा कारखान्याच्या शिरपेचात रोवला आहे. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

Visits: 111 Today: 1 Total: 1417261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *