शिर्डीतील बांधकाम मजूर हत्याकांडातील पसार तिघा आरोपींना अटक मालेगावातून जेरबंद करण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीतील बांधकाम मजूर हत्याकांडातील पसार झालेले तिघे आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगावातून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या गुन्ह्यातील एकूण सात आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले.
शिर्डीतील बांधकाम मजूर राजेंद्र आंतवन धिवर याची शिर्डीत अज्ञात इसमांनी धारदार शस्राने हत्या करत हल्लेखोर पसार झाले होते. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं. 237/2021, भादंवि कलम 302, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून उघडकीस आणला होता. यातील नाशिक येथील दोघेजण तर शिर्डीतील दोनजण अशा चार आरोपींना ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. गुन्ह्याचा जसजसा उलगडा झाला त्यानंतर गुन्ह्यात निष्पन्न झालेले वरील आरोपींचे साथीदार हसीम खान (रा. नालासोपारा), गॅस उर्फ साहिल शेख (रा. मोरवाडी, नाशिक) व साहिल पठाण (रा. पाथर्डी गाव, नाशिक) हे पसार झालेले होते. हे आरोपी हे मुंब्रा, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या परिसरामध्ये वेळोवेळी ठिकाणे बदलून व आपले अस्तित्व लपवून राहत होते. पोलीस तेथे पोहचेपर्यंत ते ठिकाण सोडून निघून जात होते.
वरील पसार आरोपींचा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकामार्फत शोध सुरू असताना कटके यांना गुप्त खबर्याकडून माहिती मिळाली की, वरील नमूद फरार आरोपी हे मालेगाव येथे लपूनछपून राहत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोहेकॉ. मनोहर गोसावी, पोना. विशाल दळवी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोकॉ. रोहित येमूल, रणजीत जाधव, रवींद्र श्रृंगासे, सागर ससाणे, चालक पोहेकॉ. बबन बेरड यांनी मालेगाव येथे जाऊन बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन आरोपी साहिल गुलशन पठाण (वय 18, रा. पाथर्डी गाव, राजवाट नाशिक), वारसी गॅसउद्दीन रजा शेख (वय 18, रा. उत्तमनगर, सिडको, नाशिक), हासिम हारुन खान (वय 20, रा. बोरी कॉलनी, नालासोपारा, जि. ठाणे) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे वरील गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत कबुली दिली आहे. पुढील कारवाई शिर्डी पोलीस करत आहे.